

RHF26B11166
राहुरी फॅक्टरी : देवळाली प्रवरा नगर परिषदेतर्फे बांधलेल्या जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम व इतर.
ट्रम्पमुळे नगर-कोपरगाव रस्ता रखडला
विखे पाटील ः अजब दाव्याने राजकीय चर्चा
सकाळ वृत्तसेवा
राहुरी, ता. १६ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर बॉम्ब टाकल्यापासून डांबर महागले. सर्वत्र तुटवडा निर्माण झाला. त्याचा फटका रस्त्यांच्या कामाला बसला. त्या ट्रम्प यांनी इराणवर मिसाईल टाकताना नगर-कोपरगावच्या ठेकेदाराला विचारले होते का? का मला विचारले होते? मिसाईल टाकू का, त्याचा काय परिणाम होणार. असा वेडा माणूस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. त्यांच्यामुळेच हा रस्ता रखडलाय, असा अजब दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.
देवळाली प्रवरा येथे स्वातंत्र्यदिनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यानंतर देवळाली प्रवरा नगरपरिषदेतर्फे राहुरी फॅक्टरी येथे वृंदावन कॉलनीत उभारलेल्या नवीन जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम होते. नगराध्यक्ष सत्यजित कदम व नगरसेवक उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले की, नगरमध्ये सुमारे ४० हजार कोटींची विकासकामे केली आहेत. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबर तुटवडा निर्माण झाल्याने नगर-कोपरगाव महामार्गाच्या कामाला सध्या दिरंगाई होत आहे. डांबराचे भाव भडकले. ५४ वरून १२० रुपयांवर गेले. डांबर प्लांट बंद झाले. पुरवठा बंद झाला. रस्त्याच्या कामांसाठी दिल्लीहून डांबर आणावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची कामे खोळंबलीत. नगर-कोपरगाव महामार्गाच्या कामालाही त्याचा फटका बसला.
..............
डिसेंबरपर्यंत थांबा, रस्ता मीच करणार
महामार्गाच्या कामावरून केवळ आंदोलन करणे किंवा समाज माध्यमांवर पोस्ट करणे हा उपाय नाही. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा. नागरिकांच्या त्रासाची जाणीव आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. हा रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो. महामार्गाच्या प्रश्नातून डिसेंबरपर्यंत नागरिकांची सुटका होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
...........
राजकारणामुळे मेंदू खराब झाला
‘मी मेंदूचा डॉक्टर आहे; मात्र राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,’ अशी मिश्कील टिप्पणीही विखे यांनी केली. ट्रम्प यांच्यावर टीका करताना त्यांनी, ‘असा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही,’ असे वक्तव्यही त्यांनी केले. यावरून मी ट्रोल होणार आहे, याचीही मला जाणीव आहे. त्याचा मला काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.