थकबाकी वसुलीसाठी नेटाने प्रयत्न व्हावेत

थकबाकी वसुलीसाठी नेटाने प्रयत्न व्हावेत

सदस्यांची थकबाकीबाबत मागणी; पाणीपट्टी वाढीचा औपचारिक ठराव मंजूर

पुणे - मिळकतकर आणि पाणीपट्टीतील थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नेटाने प्रयत्न करावेत, तसेच अनधिकृत मिळकतींना कर लावून देणारी एजंटांची साखळी मोडण्याचे आवाहन सर्वपक्षीय सदस्यांनी करवाढीच्या खास सर्वसाधारण सभेत मंगळवारी केली.

पाणीपट्टीत १५ टक्के वाढीचा औपचारिक ठराव या वेळी मंजूर झाला तर, मिळकत करात १२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. 

मिळकत करात १२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्याची घोषणा अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या पूर्वीच केली होती.

तर, पाणीपट्टीत १५ टक्के वाढ करण्याचा ठराव महापालिकेच्या मागील कार्यकाळात झाला होता. त्यामुळे त्या ठरावाला औपचारिक मंजुरी या वेळी देण्यात आली. मिळकत करात सुमारे १७०० कोटींची तर, पाणीपट्टी विभागाची सुमारे ३५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. तिच्या वसुलीसाठी नेटाने प्रयत्न करण्याची गरज सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली. पाणीपट्टी आणि मिळकत कराची थकबाकी वसूल झाल्यास महापालिकेला पुढील तीन वर्षे करवाढ करण्याची गरज भासणार नाही, असे मत बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केले. ज्या ठिकाणी महापालिकेच्या सुविधा पोचलेल्या नाहीत, परंतु नागरिक कर भरत आहे त्यांच्याकडून निम्माच कर आकारण्याचा ठराव महापालिकेने या पूर्वीच मंजूर केला असून, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी वसंत मोरे यांनी केली. ६०० चौरस फुटांच्या आतील मिळकतींना दंडाच्या रकमेत सवलत दिल्याबद्दल हेमंत रासने यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले. 

अनधिकृत बांधकामांना कर लावून देतो, असे सांगून एजंट नागरिकांवर तिप्पट कर वाढ लादून त्यांची फसवणूक करीत आहेत. तसेच मिळकत कराची दुबार देयके, चुकीची देयके आदींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, अशी तक्रार बहुसंख्य सदस्यांनी केली. या प्रसंगी झालेल्या चर्चेत डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रवीण चोरबेले, धीरज घाटे, अविनाश बागवे, अजय खेडेकर, नंदा लोणकर, बाळा ओसवाल, माधुरी सहस्त्रबुद्धे, भैय्यासाहेब जाधव, हाजी गफूर पठाण, कालिंदी पुंडे, दिलीप वेडेपाटील, प्रकाश कदम, जयंत भावे, राजेंद्र शिळीमकर, अमोल बालवडकर, योगेश ससाणे, नाना भानगिरे आदींनी सहभाग घेतला. 

पाणीपट्टीतील वाढ ‘राष्ट्रवादी’मुळे कमी !
पाणीपट्टीची वाढ कायम ठेवल्याबद्दल, काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपवर टीका केली तेव्हा दिलीप बराटे यांनी, शहराला २४ तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मागील सभागृहाने ठराव बहुमताने मंजूर केला होता, असे निदर्शनास आणले. तसेच आयुक्तांनी त्या वेळी पावणे चारशे टक्‍क्‍यांनी पाणीपट्टीत वाढ सुचविली होती. म्हणजेच ३२ वर्षे सलग पाच टक्‍क्‍यांनी पाणीपट्टी वाढणार होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्तावाचा अभ्यास करून पहिल्या वर्षी १२ आणि पुढील चार वर्षे प्रत्येकी १५ टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा ठराव मंजूर केला. त्यामुळे पाणीपट्टीतील वाढ २७८ टक्‍क्‍यांनी कमी झाली, असे विरोधी पक्षनेते तुपे यांनी लक्षात आणून दिले. 

..तर २४ तास पाणीपुरवठ्याचा फेरविचार ! 
शहराला २४ तास पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे म्हणून राष्ट्रवादीने हा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार, योजनेचे काम सुरू झाले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी पाण्याच्या टाक्‍या बांधण्याला स्थगिती दिली आहे. चार दिवसांत ती उठवतो, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. परंतु, या बाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली नाही तर, राष्ट्रवादी योजनेचा फेरविचार करेल, असा इशारा तुपे यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com