तुकोबांच्या अभंगांची तेलुगूलाही गोडी 

शंकर टेमघरे  - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - तेलंगणमधून केवळ तुकोबारायांच्या प्रेमापोटी श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या तेलुगू भाविकांना केवळ भाषेचा अडसर म्हणून गाथा पारायण करता येत नाही, ही भावना कर्णे गजेंद्र भारती महाराज यांच्या मनाला लागली. तब्बल दोन वर्षे परिश्रम घेऊन त्यांनी मराठीतील संपूर्ण तुकाराम गाथा तेलुगू भाषेत लिप्यंतर केली, त्यामुळे तुकोबारायांच्या अभंगवाणीचा तेलुगू भाषकांनी घोष केला.

पुणे - तेलंगणमधून केवळ तुकोबारायांच्या प्रेमापोटी श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या तेलुगू भाविकांना केवळ भाषेचा अडसर म्हणून गाथा पारायण करता येत नाही, ही भावना कर्णे गजेंद्र भारती महाराज यांच्या मनाला लागली. तब्बल दोन वर्षे परिश्रम घेऊन त्यांनी मराठीतील संपूर्ण तुकाराम गाथा तेलुगू भाषेत लिप्यंतर केली, त्यामुळे तुकोबारायांच्या अभंगवाणीचा तेलुगू भाषकांनी घोष केला. अभंग गाताना भाषा तेलगू; पण उच्चार अस्सल मराठी, अशा आगळ्या वेगळ्या पारायणाने "आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्नें । शब्दांचींच शास्त्रें यत्न करूं ।। शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ।।...' या तुकोबारायांच्या शब्दांची अनुभूती भंडारा डोंगरावर आली. 

तेलंगण राज्यातील एकांबा गावातील गणेशाश्रमाचे सुमारे चारशे तेलुगू भाषक भाविक गेले आठ दिवस भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहासाठी आले होते. तुकोबांच्या गाथेचे पारायण सुरू होते. गाथेतील अभंग तेलुगू भाषेत होते, उच्चार मात्र मराठीत ऐकू येत होते. उत्सुकता म्हणून पाहिले, तर तुकोबांची संपूर्ण गाथाच तेलुगूत लिहिलेली दिसून आली. अधिक चौकशी केली असता कळले, की गेल्या 24 वर्षांपासून गणेशाश्रमाच्या माध्यमातून तीन- चारशे तेलुगू भाविक भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहासाठी येतात. त्यातील महाराष्ट्र- तेलंगण सीमा भागातील भाविकांना मराठी येते. मात्र, बहुतेकांना मराठीचा गंधही नव्हता. त्यामुळे मराठीतील गाथेचे पारायण करता येत नव्हते. त्यांची ही अडचण दूर करण्याचा विचार भारती महाराजांच्या मनात आला आणि संपूर्ण गाथाच तेलुगूत लिहिण्याचा संकल्प त्यांनी सोडला. त्यांना नारायणराव पाटील यांचे सहकार्य लाभले आणि दोन वर्षांत तेलुगू भाषेत तुकोबारायांचे अभंग रूपांतरित झाले. या गाथेच्या पाच हजार प्रती तेलुगू भाषक भाविकांना वितरित केल्या आहेत. यंदाच्या सप्ताहात सर्व तेलुगू भाषकांनी मोठ्या भक्तिभावाने गाथेचे सामुदायिक पारायण केले. एकत्रित अभंग गाताना मराठी आणि तेलुगू भाषकांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. 

संत वाङ्‌मय तेलुगूत आणण्याची गरज 
तेलंगणमध्ये गणेशाश्रमाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचे कार्य सुरू आहे, त्यामुळे परिसरातील सुमारे पन्नास गावांतील भाविक यात सहभागी होतात. दरवर्षी भंडारा डोंगरावरही सप्ताह आयोजित केला जातो, त्यात सर्वजण सहभागी होतात. त्यांना भाषेची अडचण असल्याने गाथाच तेलुगू भाषेत रूपांतरित केली. आता प्रत्येक अभंगाचे तेलुगू भाषेत थोडक्‍यात निरूपण लिहिण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे तुकोबारायांचे विचार सर्वच तेलुगू भाषकांनाही समजतील. वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसार आता तेलंगणमध्येही होऊ लागला आहे. सर्वच संत वाङ्‌मय तेलुगू भाषेत येण्याची गरज आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे भारती महाराज यांनी सांगितले. 

Web Title: Tukaram Maharaj Kannada language book