‘तुकारामसमर्थ’

गोपाळ कुलकर्णी
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील अप्रकाशित ‘तुकाराम चरित्र’ उजेडात आले आहे. 

रामदासी वाङ्‌मय आणि रामदासी मठांच्या अभ्यासिका मनीषा बाठे यांनी यासंबंधीचे हस्तलिखित शोधून काढले असून, यामुळे रामदासी परंपरेतदेखील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांना आदराचे स्थान होते हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या ग्रंथात संत तुकाराम महाराज यांचा उल्लेख ‘तुकारामसमर्थ’ असा करण्यात आला आहे. 

नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील रामदासी मठातील दफ्तरात या संबंधीचे हस्तलिखित आढळून आले असून, समर्थ शिष्य बाळकाराम यांनी याचे 

जतन केले आहे. या दफ्तरातच त्यांनी ‘श्री समर्थ चरित्र’ व ‘श्री तुकाराम चरित्रा’ची हस्तलिखिते जतन करून ठेवल्याचे आढळले. ही चरित्रे बाळकाराम रामदासींचा कालखंड लक्षात घेता समर्थोत्तर लगेचच म्हणजे शके १६७५ ते शके १७३१ या कालखंडातील असून, त्यात समाप्तीच्या पानावर शके १७३१ असा उल्लेख आहे. हे दोन्ही ग्रंथ मराठी बाळबोध लिपीतील आहेत. विशेष म्हणजे रामदासी परंपरेत याआधीही तुकाराम चरित्रे लिहिण्यात आली आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनीही या संशोधनाला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायाच्या फडांवर, मठांत तुकोबांची जितकी हस्तलिखिते उपलब्ध होतात तितकी हस्तलिखिते रामदासी मठात आहेत.’’

दरम्यान, या संशोधनास नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. योगेश नामदेव पाटे व रामदासी मठाचे दीपक कुलकर्णी, जोगळेकर यांच्यासह सतीश पाटे, कुंदन डुंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे बाठे यांनी सांगितले.

रामदासी परंपरेचे तत्त्वज्ञान प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालणारे आहे. पण याच मठांत वेदांत परंपरेतील तत्त्वज्ञानाचे प्रमाण म्हणून वारकरी वाङ्‌मयाचेही अध्ययन होत असे, ज्यात प्रामुख्याने तुकोबांच्या अभंगांचाही समावेश आहे.
- मनीषा बाठे, रामदासी वाङ्‌मयाच्या अभ्यासिका

हस्तलिखिताचे स्वरूप
बाळकरामांच्या मठातील ‘श्री तुकाराम चरित्र’ हे हस्तलिखित स्वरूपात असून, हा ग्रंथ बारा इंच बाय सहा इंच आकाराच्या कागदावर असून, त्याची पृष्ठसंख्या शंभर आहे. या ग्रंथात एकूण १३ अध्याय आहेत. यात ग्रंथ लिखाणाच्या कालखंडाचा स्पष्ट उल्लेख नसला तरीसुद्धा तो ‘संतविजय’ या ग्रंथाच्या समकालीन असावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaramsamarth Tukaram Character Sant Tukaram maharaj