तुळशीत ''शिरपूर पॅटर्न'' राबविण्याचे आमदार सुभाष देशमुख यांचे आवाहन

तुळशीत ''शिरपूर पॅटर्न'' राबविण्याचे आमदार सुभाष देशमुख यांचे आवाहन
Published on: 

MOD26A03499
तुळशी (ता. माढा) : येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार सुभाष देशमुख. यावेळी उपस्थित ज्येष्ठ भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर, जलतज्ञ् डॉ. दत्ता देशकर आणि ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर
---
तुळशीच्या पाणीप्रश्नासाठी ‘शिरपूर पॅटर्न’
आमदार सुभाष देशमुख; आठ कोटींच्या निधीची हमी
सकाळ वृत्तसेवा
मोडनिंब, ता. ३ : जलसंधारणासाठी देशभर गाजलेल्या शिरपूर पॅटर्नची तुळशीत अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. गाव विक्रीला काढल्याच्या फलकामुळे चर्चेत आलेल्या तुळशीला जलसंधारण क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.
आमदार सुभाष देशमुख यांच्यासह शिरपूर पॅटर्नचे प्रवर्तक ज्येष्ठ भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर, जलतज्ज्ञ डॉ. दत्ता देशकर, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर आदींनी तुळशीला भेट दिली. यावेळी शिरपूर पॅटर्न राबविण्यासाठीचे सर्वेक्षणही तातडीने सुरू करण्यात आले. जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटीमुळे ‘पाणीदार तुळशी’चे स्वप्न साकारण्याच्या ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आमदार देशमुख म्हणाले, बाहेरून पाणी आणण्यापेक्षा पावसाचे पाणी अडवून जलस्रोत जिवंत केले, तर कोणाकडे काही मागण्याची वेळ येणार नाही. गाव विकायला काढणे हा समस्येवरील तोडगा नाही आणि गाव विकण्याचा फलक लावून प्रश्न सुटणार नाही. तुमच्या प्रश्नांची जाणीव आणि भावना समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपल्यातील ताकद ओळखा. ‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीप्रमाणे सर्वांनी एकसंघपणे ठरवले, तर अशक्य काहीच नाही. सर्वांनी एकत्रित काम करून चमत्कार घडवूया.
तुळशीत शिरपूर पॅटर्नअंतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठी साधारण आठ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. हा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याची हमी आमदार देशमुख यांनी दिली.
यावेळी सरपंच डॉ. शरद मोरे, मनोज शहा, दिगंबर माळी, प्रमोद वसेकर, बापू दगडे, सचिन कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com