हळद पिकावरील कंदमाशी व हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन

हळद पिकावरील कंदमाशी व हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन
Published on

पान १४ साठी

हळद पिकावरील कंदमाशी,
हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन
-----------------
डॉ. सिद्धनाथ शेंडेकर, नागेश दत्तगोंडे, रमेश देशमुख
---------------------------------
यावर्षी पावसाच्या उशिरा आगमनामुळे हळद लागवडीस विलंब झाला. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवड पूर्ण होते. मात्र यावर्षी लागवडी २० जूनच्या लागवडी झालेल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्या. हळद लागवड होऊन साधारण अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पीक सध्या फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. या काळात प्रामुख्याने कंदमाशी व हुमणी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींच्या प्रादुर्भावामुळे हळदी उत्पादनात मोठी घट येते. प्रादुर्भाव ओळखण्यासाठी हळद पिकाचे नियमित निरिक्षण करावे. नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
---------------
कंदमाशी ः
- कंदमाशी ही हळद पिकातील एक प्रमुख कीड आहे. कंदमाशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात साधारणपणे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असते.

ओळख ः
- कंदमाशीची प्रौढ अवस्था आकाराने मोठ्या डासासारखी, काळ्या रंगाची असते.
- माशीला एकूण सहा पाय असून ते शरीरापेक्षा लांब असतात. पायांची टोके पांढऱ्या रंगाची असतात.
- पाठीवर दोन पातळ तथा पारदर्शक अशा पंखांची जोडी असते, त्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.
- अंडी पांढरट रंगाची असतात.
- अळी अवस्था पिवळसर पांढऱ्या रंगाची असून, तोंडाकडील भाग हा निमुळता तर पाठीमागे फुगीर होत जातो.
- कोष गडद तपकिरी रंगाचे असतात.

जीवनक्रम ः
- कंदमाशीच्या अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा वाढीच्या एकूण चार अवस्था असतात.
- कंदमाशीची प्रौढ मादी झाडाच्या खोडाच्या बुंध्याजवळ किंवा खोडाच्या सालीच्या आत अंडी घालते. अंड्यातून ५ ते ७ दिवसांच्या आत लालसर पिवळ्या रंगाच्या अळ्या बाहेर पडून खोडाच्या आतील भागात शिरकाव करतात. अळ्यांना पाय नसतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या ९ ते १० मि.मी. लांबीच्या असून पिवळसर पांढऱ्या रंगाच्या व चिकट स्वरूपाच्या असतात.
- अळी अवस्था १५ ते २० दिवसात पूर्ण होते व नंतर अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था साधारणतः वातावरणावर अवलंबून असते. वातावरण पोषक असल्यास १५ ते ३० दिवसांत कोषातून प्रौढ कंदमाशी बाहेर पडते. अशाप्रकारे ४५ ते ५० दिवसांत कंदमाशीच्या एका पिढीचा जीवनक्रम पूर्ण होतो.

नुकसान ः
- अंडी उबवल्यानंतर कंदमाशीच्या अळ्या खोडात किंवा उघड्या कंदातून आत मध्ये शिरून त्यावरती उपजीविका करतात.
- अळ्यांचा कंदामध्ये शिरकाव झाल्याने खोड व कंद मऊ होऊन त्यामध्ये पाणी जमा होते.
- अळीच्या विष्ठेमुळे व सुटलेल्या पाण्यामुळे कंदामध्ये पिथियम, फ्युजारियम व अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. शेंड्याचा तसेच खोडाचा भाग सुकू लागतो. शेवटी कंद मऊ होऊन ते कुजतात.
- रोगग्रस्त कंदांना काही वेळेस सूत्रकृमीचा देखील प्रादुर्भाव होतो. अशा झाडांचा शेंडा हाताने ओढल्यास तो सहजपणे उपटला जातो. त्यातून उग्र दुर्गंध येतो.

व्यवस्थापन ः
- हळद लागवडीचे नियमित निरीक्षण करावे. हळदीचा शेंडा तसेच पाने पिवळी पडून सुकत असल्यास, अशावेळी कंदमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे, असे समजावे.
- प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी,
क्लोरपायरीफॉस २० मिलि किंवा
क्विनॉलफॉस २० मिलि यापैकी एका रासायनिक कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
- उघडे पडलेले कंद मातीत व्यवस्थित झाकून घ्यावेत.

एरंडीच्या भरड्याचे आमिष ः
कंदमाशीच्या प्रभावी व कमी खर्चातील प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी प्रौढ कीटकांना आकर्षित करणारे एरंडीच्या भरड्याचे आमिष तयार करून त्याचा वापर करणे अत्यंत प्रभावी ठरते. यासाठी एक एकर क्षेत्राकरिता, अंदाजे २ किलो एरंडीच्या बियांचा जाडसर भरडा तयार करावा. त्यात यीस्ट २५ ते ४० ग्रॅम, डाळीचे पीठ ५० ग्रॅम आणि ८ लिटर पाणी घेऊन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण हे ३ ते ४ दिवस सावलीत आंबविण्याकरिता ठेवावे. या दरम्यान सकाळी व संध्याकाळी मिश्रण काठीने ढवळावे. तीन ते चार दिवसांनी मिश्रणाचा विशिष्ट उग्र वास येण्यास सुरुवात होते. मिश्रणात तेवढेच पाणी मिसळून हे तयार द्रावण प्लॅस्टिकच्या टोपल्यात एकरी ७ ते ८ या प्रमाणात शेतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. प्रौढ कंदमाशा या गंधाकडे आकर्षित होतात व मिश्रणात पडून मरण पावतात. या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनामुळे कंदमाशीची अंडी घालण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर कमी होऊन पुढील प्रादुर्भावास आळा घालण्यात येतो.
---------------------
हुमणी अळी ः
- ही बहुभक्षीय कीड असून हळद पिकासह इतर प्रमुख केळी, ऊस, सोयाबीन इत्यादी पिकांमध्येही प्रादुर्भाव करते. हळद पिकात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास सुमारे १० ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

ओळख ः
- किडीची प्रामुख्याने अळी अवस्था हळद पिकासाठी हानिकारक असते.
- अळी ही पांढऱ्या दुधाळ रंगाची असून ती इंग्रजीच्या सी (C) आकाराची असते. डोक्याचा व तोंडाचा भाग गडद तपकिरी रंगाचा असून शरीरावर लहान केस असतात.
- प्रौढ भुंगेरा गडद लालसर तपकिरी ते काळ्या रंगाचा असतो. मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते. भुंगेरे हे निशाचर असून एप्रिल-मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर बाहेर पडतात. पोषक वातावरणात सायंकाळी जमिनीतून बाहेर पडलेले भुंगेरे कडूनिंब, बोर आणि बाभूळ इ. झाडांवर पाने खाण्यासाठी जमा होतात. या झाडांवरती नर-मादीचे मिलन होते. त्यानंतर सूर्योदयापूर्वी पुन्हा ते जमिनीत जातात. मादी झाडाच्या मुळांभोवती जमिनीत अंडी घालते. शेणखत किंवा कुजत असलेल्या झाडांच्या पालापाचोळ्यात व कचऱ्यात देखील अंडी घालते. अंडी साबुदाण्यासारखी पांढरट पिवळसर रंगाची असतात.

जीवनक्रम ः
- हुमणी किडीचा जीवनक्रम साधारणतः एका वर्षात पूर्ण होतो. वाढीच्या प्रामुख्याने चार अवस्था असतात.
- अंडी घातल्यानंतर १५ ते २० दिवसांत अळी बाहेर पडते. अळी ६ ते ८ महिन्यांच्या काळात पिकांच्या मुळांवर तसेच शेतातील इतर सेंद्रिय घटकांवर वास्तव्य करून ३ वेळेस कात टाकून पूर्ण वाढीच्या अवस्थेत जाते.
- पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत १५ ते ३० सें.मी. खोल जाऊन स्वतःभोवती मातीचे टनक सदृश्य आवरण तयार करून कोष अवस्थेत जाते. कोश अवस्था १४ ते २२ दिवसांची असू शकते. त्यानंतर त्यातून भुंगेरा बाहेर पडतो. भुंगेऱ्याची प्रौढ अवस्था ही ४५ ते १०० दिवसांची असते.

नुकसानीचा प्रकार ः
- हुमणीच्या अळ्या सुरुवातीला जमिनीतील सेंद्रिय घटकांवर उपजीविका करतात. त्यानंतर मुख्य पिकांच्या मुळांवर हल्ला करतात. प्रादुर्भवाच्या तीव्र अवस्थेत अळ्या कंदही कुरतडतात. त्यामुळे हळदीचे पीक सुरुवातीला पिवळे पडते व नंतर रोपे वाळू लागतात. असे प्रादुर्भावग्रस्त रोप उपटल्यास हातात सहज उपटून येते.

एकात्मिक व्यवस्थापन ः
या किडीचे प्रभावी नियंत्रण करण्याकरिता सामूहिकरीत्या व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते.

- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे किडीच्या जमिनीतील कोष अवस्था सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. तसेच पक्ष्यांद्वारे खाल्या जातात.
- शेतात पूर्णपणे कुजलेले शेणखत वापरावे. पिकांचे अवशेष नष्ट करून फेरपालट करावा.
- सायंकाळच्या वेळी बाहेर पडणारे भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत.
- प्रकाश सापळ्यांचा वापर करून प्रौढ भुंगेरे नष्ट केल्यास नर-मादी मिलन व अंडी घालण्याचे प्रमाण कमी होऊन पुढील प्रादुर्भावास आळा बसतो.

जैविक व्यवस्थापन ः
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा प्रादुर्भाव झाल्यास जैविक पद्धतींचा अवलंब करावा. त्याकरिता मेटारायझियम ॲनिसपोली २.५ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेणखत किंवा इतर सेंद्रिय खतात मिसळावे. तसेच बिव्हेरिया बॅसियाना ५० ते ६० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे पिकांच्या मुळांभोवती आळवणी स्वरूपात किंवा ठिबक संचाद्वारे वापर करावा.

रासायनिक उपायोजना ः
- किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास,
क्लोरपायरिफॉस २० मिलि किंवा
क्विनॉलफॉस २० मिलि किंवा
इमिडाक्लोप्रिड २० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळांभोवती आळवणी करावी.
-----------------------
- डॉ. सिद्धनाथ शेंडेकर, ९६५७६३५५८२
(संशोधन सहयोगी, अनुवंशशास्त्र व वनस्पती प्रजननशास्त्र,
बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत, जि. हिंगोली)

फोटो ः
कंदमाशी (प्रौढ अवस्था) अळी अवस्था कोष अवस्था खोड व कंद सडते
एरंडीच्या भरड्याचे आमिष (सापळा)
हुमणी (अळी अवस्था) हुमणी (प्रौढ अवस्था) प्रकाश सापळा
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com