पाच वर्षांत बारा हजार बाळांना ‘ससून’ने दिली नवसंजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sassoon hospital

पाच वर्षांत बारा हजार बाळांना ‘ससून’ने दिली नवसंजीवनी

पुणे - अत्याधुनिक यंत्रणा, सूक्ष्म नियोजन, समर्पित भावनेने काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या मेहनतीने गेल्या पाच वर्षात बारा हजार बाळांना नवसंजीवनी मिळाली आहे. जन्म आणि मृत्यूच्या दाढेतून सुटका करणारा हा शिशू विभाग सातत्याने क्रियाशील आहे. आपल्या बाळाच्या पुनर्जन्माचा आनंद मातांच्या चेहऱ्यावर पाहून समाधान वाटते, असे मत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी व्यक्त केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या साह्याने २०१७ मध्ये ससून रुग्णालयातील बालरोग विभागात नवजात शिशू अतिदक्षता केंद्र (एनआयसीयू) उभारण्यात आले. या ‘एनआयसीयू’ला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विभागातर्फे आनंद साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनी अनेक पालकांनी आपल्या मुलांसमवेत रुग्णालयाला भेट दिली. यावेळी व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, डॉ. अजय तावरे, डॉ. विजय जाधव, विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर, पुष्पा मारकड, फाउंडेशनचे यास्मीन शेख, जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते. ‘एनआयसीयू’मधील सर्व डॉक्टर्स, परिचारिका यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. उपस्थित पालकांनी सर्वांचे आभार मानले. ‘ससून’तर्फे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. किणीकर म्हणाल्या, ‘कोणतीही चांगली गोष्ट टीमवर्कमुळे उत्तम होते. प्रत्येकाच्या योगदानामुळेच हजारो बालकांना सक्षम बनवण्यात यश आले. ससून रुग्णालयातील आरोग्यसेवेवर लोकांचा विश्वास दृढ होत आहे, याचा आनंद आहे. महाराष्ट्र शासनाने या युनिटला राज्यातील सर्वोत्कृष्ट युनिट म्हणून मान्यता दिली आहे.’’

छाब्रिया म्हणाल्या, ‘एनआयसीयू''च्या माध्यमातून बालकांना सक्षम करता आल्याचा आनंद आहे. समविचारी देणगीदारांच्या पाठिंब्याने नेत्र चिकित्सालय, डेंटल लेझर युनिट स्थापन केले. ससून हे लेझर युनिट असलेले हे पहिले सरकारी रुग्णालय आहे. दीड हजाराहून अधिक रुग्णांनी सेवांचा लाभ घेतला असून ५० हून अधिक रुग्णांवर दंतरोपण यशस्वी झाले आहे. याशिवाय, आपत्कालीन ट्रॉली बेड, बेडस्प्रेड असलेली गादी, उशांसह ब्लँकेट, चादरी (सोलापुरी चादर) आणि बरेच काही दान केले आहे. त्याचप्रमाणे एप्रिल २०१८ मध्ये अत्याधुनिक यकृत प्रत्यारोपण युनिटची स्थापना करण्यात आली. अशी स्थापना करणारे हे पहिले सरकारी रुग्णालय आहे.’