येरवडा - बारा वर्षांनंतर मुलीला भेटले हरविलेले वडिल

दिलीप कु-हाडे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

येरवडा - मुंबई येथील कैलास बारा वर्षांपूर्वी हरविले होते. नातेवाईकांनी त्यांची आशा सोडली होती. दरम्यान सोलापूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना मनोरुग्ण म्हणून न्यायालयाच्या परवानगीने येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील औषधोपचार, येथील समाजसेवक व मुंबई पोलिसांच्या प्रयत्ननातून कैलास घरी परतला. त्यांना घेण्यासाठी त्यांची मुलगी आली होती. यावेळी झालेल्या बापलेकीच्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा अश्रू आवरता आले नाही.

सोलापूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने पाच महिन्यापुर्वी कैलास यांना न्यायालयाच्या परवानगीने मनोरुग्ण म्हणून येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अभिजित फडणिस यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकारतज्ञ डॉ. मनोहर पवार व समाजसेवक अधिक्षक ब्रम्हदेव जाधव यांनी उपचार सुरु केले. वैद्यकीय उपचाराला कैलास प्रतिसाद देऊ लागले. त्यावेळेस ब्रम्हदेव जाधव रुग्णाशी चर्चा करुन नाव, पत्ता शोधत होते. वैद्यकीय उपचार व समुपदेशनामुळे कैलास बरे होत होते. समुपदेशना मध्ये रुग्णाने मुंबई बद्दल जुजबी माहिती दिली. त्यावरुन जाधव यांनी मुंबई पोलिसांना संपर्क साधून रुग्णांच्या दादर येथील नातेवाईक यांची माहिती दिली. दादर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक एस.भाबड यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना शोधून काढले.

कैलास यांच्या पत्नी व मुलीस माहीत मिळताच संबंधित कागदपत्रासह त्यांनी समाजसेवा अधिक्षकांशी संपर्क साधला. त्यानंतर ते मनोरुग्णालयात आले. येथे मुलीने तत्काळ वडिलांना ओळखले. कैलास तब्बल बारा वर्षापासून बेपत्ता होते. मुलगी अक्षरशः वडिलांच्या गळ्यात पडून रडत होती. नातेवाईकांनी कैलास चा सगळीकडे शोध घेतला होता. पोलिस ठाण्यात हरविल्याची सुद्धा नोंद केली होती. मात्र काहीच उपयोग झाला नव्हता. नंतर त्यांनी कैलास परत येण्याची आशा सोडून दिली होती. परंतु प्रादेशिक मनोरुग्णालयमुळे कैलास सुस्थितीत मिळाल्यामुळे सर्व नातेवाईक आनंदी झाले.

रुग्णालयातून बाहेर पडताना नातेवाईकांनी जाधव व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केवळ मनोरुग्णालयामुळे आपले वडील तब्बल बारा वर्षांनी सुस्थितीत मिळाल्यामुळे मुलीला आनंदाश्रू आवरता येत नव्हते. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा अश्रू आवरता आले नाही.

Web Title: Twelve years later the girl met with a lost father