अडीचशे परदेशी नागरिक पुणे पोलिसांच्या काळ्या यादीत; एवढ्या जणांना देश सोडण्याची (लिव्ह इंडिया) नोटीस

पांडुरंग सरोदे @spandurangSakal
Wednesday, 9 September 2020

कोंढवा-येवलेवाडी रस्त्यावर अमली पदार्थ (कोकेन) विक्रीसाठी आलेल्या जेम्स हिलरी ॲसी (मूळ रा. दक्षिण आफ्रिका) याला अमली पदार्थ व खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ५५ ग्रॅम वजनाचे व साडेतीन लाख रुपये किमतीचे कोकेन पोलिसांनी जप्त केले. अशा किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.

पुणे - कोंढवा-येवलेवाडी रस्त्यावर अमली पदार्थ (कोकेन) विक्रीसाठी आलेल्या जेम्स हिलरी ॲसी (मूळ रा. दक्षिण आफ्रिका) याला अमली पदार्थ व खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ५५ ग्रॅम वजनाचे व साडेतीन लाख रुपये किमतीचे कोकेन पोलिसांनी जप्त केले. अशा किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. मागील दीड वर्षात पुणे पोलिसांनी तब्बल अडीचशे परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकले आहे, तर ९५ जणांना देश सोडण्याची (लिव्ह इंडिया) नोटीस बजावण्यात आली आहे. ६७ जणांची सक्तीने मायदेशी रवानगी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात अफगाणिस्तान, इराक, इराण, नायजेरियातील युवकांकडून पुण्यात शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर पर्यटन, वैद्यकीय उपचार, व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने व सुरक्षिततेची हमी मिळत असल्याने परदेशी नागरिक पुण्यात येतात. येमेनमधून वैद्यकीय उपचारासाठी नागरिक पुण्याला पसंती देतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंडोनेशिया, कोरियामधून उद्योग-व्यावसाय व अन्य देशांतून पर्यटनाच्या निमित्ताने पुण्याला भेट देण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. काही जण या शहराशी चांगलेच एकरूप झाले असल्याची समाधानकारक बाब आहे. असे असतानाही काही परदेशी नागरिकांकडून मात्र शहराच्या कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान देऊन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केले जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

काही परदेशी नागरिक अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करतात, तर काही जणांचा आर्थिक फसवणूक, जबरी चोरी, बेदरकारपणे वाहने चालवून अपघात करणे, अशा गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. काही नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून पुण्यात राहत आहेत. अशा परदेशी नागरिकांकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांची नोंद पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडे केली जाते. 

शहरात परकीय नागरिकांकडून किरकोळ ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्याबाबतची संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयामार्फत संबंधित देशाच्या दूतावासाशी संपर्क साधून त्यांना मायदेशी पाठविले जाते. थोडक्‍यात, त्यांच्याकडून घडलेल्या गुन्ह्यानुसार कारवाई होते. 
- मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred and fifty foreign nationals in the black list of Pune police