चालकाचे नियंत्रण सुटल्याने 'एसटी'चा अपघात; दोन जखमी 

डी.के. वळसे पाटील
मंगळवार, 16 जुलै 2019

मंचर : मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर कलोते (ता. खालापूर) येथे माधवबाग हॉस्पिटलजवळ कुर्लाहून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी गाडीने दुभाजक ओलांडून समोर असलेल्या कंटेनरला धडक दिली. मंगळवारी (ता. १६) दुपारी तीन वाजता अपघात झाला. अपघातात एसटी चालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे. गाडीत ५९ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये मंचर, घोडेगाव, तळेघर, डिंभे गावातील प्रवाश्यांचा समावेश आहे. अन्य सर्व प्रवासी व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले. 

राज्य परिवहन महामंडळाची कुर्ला आगारातून निघालेली एसटी गाडी (एमएच १४ बीटी २४१०) भीमाशंकरकडे जात होती. कलोते (ता. खालापूर) गावाजवळ असलेल्या माधवबाग हॉस्पिटल समोर एसटी गाडी आल्यानंतर चालक विवेक मोरे यांचे नियंत्रण सुटले. गाडी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येत असलेल्या कंटेनरला धडकली. झालेल्या अपघातात मोरे व जिजाबा तळेकर (वय ६५, रा. तळेकरवाडी- घोडेगाव, साल) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता मोठी होती. सुदैवाने इतर प्रवाश्यांना फारशी दुखापत झाली नाही. 

अपघात स्थळी जाऊन ताबडतोब उपअधीक्षक रणजीत पाटील,  खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित कांईगडे, तहसीलदार इरेश चप्पलवार, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, यांनी तसेच नागरिक व सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी जखमींना मदत केली इतर प्रवाश्यांना धीर दिला. अपघातानंतर वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन मंचर, भीमाशंकरला जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी पर्यायी एसटी गाडीची सोय उपलब्ध करून दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two injured in 'ST' accident due to driver control of pune