चोरट्यांच्या हल्ल्यात मायलेकी जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पारगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील मांदळेवाडी येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तिघांना जबर मारहाण केली. यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने मायलेकी जखमी झाल्या. त्यापैकी आईच्या डोक्‍याला खोलवर जखमा असल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील तीन तोळ्यांचे दागिने व रोख २० हजार रुपये, असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज लांबविला.

आंबेगाव व शिरूर या तालुक्‍यांच्या हद्दीवर असलेल्या मांदळेवाडी गावातील कारखीला वस्तीवर तुकाराम शंकर आदक त्यांच्या पत्नी मंदा आदक यांच्याबरोबर राहतात. बाळंतपणासाठी माहेरी आलेली त्यांची मुलगी प्रियंका अविनाश देवकर व तिचे दीड महिन्याचे बाळ याठिकाणी होते. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

झोपलेल्या मंदा आदक व त्यांची मुलगी प्रियांका देवकर या दोघींना जबर मारहाण करत अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. कपाटातून २० हजार रुपये चोरून नेले. मंदा आदक यांच्या डोक्‍यात चोरट्यांनी कु-हाड किंवा धारदार शस्त्रांनी वार केल्याचे खोलवर जखमा झाल्या असून, २२ टाके पडले आहेत. तुकाराम आदक यांनाही मारहाण झाल्याने ते भेदरले आहेत.

मांदळेवाडी या गावात कुठल्याच मोबाईल कंपनीला नेटवर्क मिळत नसल्याने मध्यरात्री चोरीची घटना घडली. ही घटना पहाटे पाच वाजता उघडकीस आली. शेजारील त्यांचे भाऊ गुलाब शंकर आदक यांच्याही घरात चोरट्यांनी चोरी केली. परंतु, चोरट्यांच्या हाताला काहीही लागले नाही.

मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे, पोलिस हवालदार राजेंद्र हिले व सागर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

सुदैवाने बाळाला इजा नाही
प्रियांका ही बाळंतपणासाठी माहेरी आली होती. तिच्या कुशीत तिचे दीड महिन्याचे चिमुकले बाळ होते. सुदैवाने त्या बाळास कुठलीही इजा पोचली नाही. पण, मंदा आदक व प्रियांका देवकर यांना मात्र डोक्‍यात, कानामागे चोरट्यांनी जबर वार केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two injured in thieves attack Crime