बारामतीत आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

शहरातील कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, आज कोरोनाने आणखी दोघांचा बारामतीत बळी गेला.

बारामती : शहरातील कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, आज कोरोनाने आणखी दोघांचा बारामतीत बळी गेला. यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या आता आठवर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या 80 वर जाऊन पोहोचली असून त्यापैकी 32 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारपर्यंत पाठवलेल्या 53 स्वॅब नमुन्यांपैकी 49 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र गुनवडी येथील 64 वर्षांच्या ग्रामस्थाचा अहवाल मात्र पॉझिटीव्ह आला आहे. तीन अहवाल अजून प्राप्त व्हायचे आहेत. दरम्यान गुनवडी येथील ज्या रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा तसेच भिकोबानगर येथील रुग्णाचाही काल रात्री उशीरा मृत्यू झाला. या दोघांनाही त्रास जाणवत होता. या दोघांचाही मृत्यू बारामतीच्या रुई रुग्णालयात झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती कोरोनामुक्त झाली आहे, असे वाटत असतानाच रुग्णांची संख्या वाढू लागली आहे तर बळींचाही आकडा वाढतच चाललेला असल्याने प्रशासन चिंताग्रस्त आहे. अनेक उपाययोजना आखूनही कोरोनाचा संसर्ग काही कमी होत नाही. अनेकदा कोरोनाचा संसर्ग नेमका कोठून झाला असावा हे शोधून काढणेही अवघड होत असल्याने प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज प्रशासनाने बोलून दाखवली आहे. 

मास्कचा वापर न करणे, सॅनिटायझर्सचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशा बाबींसह गर्दीच्या ठिकाणी अधिक काळचा वावर अशा अनेक कारणांसह बाहेरगावाहून आलेल्या लोकांमुळेही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. कोरोना कोणालाही होऊ शकतो हे रुग्णांची यादी पाहिल्यानंतर सहजतेने लक्षात येते, त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबियांची पुरेपूर काळजी घ्यायला हवी. ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाहेर कमी पडणे, तसेच पुरेशी काळजी घ्यायला हवी असेही आवाहन करण्यात आले आहे.

(Edited By : Krupadan Awale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more corona patients die in Baramati Pune