
पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात बूडून दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Youth Drown : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडून पुन्हा दोन तरुणांचा मृत्यू
सिंहगड - पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात बूडून दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फरहान आलीम शेख (वय 18, रा. दिनेश हाईट्स शिवतीर्थनगर, कोथरूड) व साहिल विलास ठाकर (वय 19, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी तरुण-तरूणीचा बुडून मृत्यू झाला होता.
सोनापूर गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोथरूड येथील पाच तरुण फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास यातील फरहान आणि साहिल हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणातच दोघेही बुडाले. इतर तरुणांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थांना माहिती मिळाली. सोनापूरचे ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष पवळे यांनी तात्काळ याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली.
हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस नाईक संतोष भापकर, दिपक गायकवाड हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल घोडे, किशोर काळभोर, भाऊसाहेब आव्हाड, महेश घटमळ, अतुल रोकडे या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेऊन बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. याबाबत हवेली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
दारुची नशा बेतली जीवावर......... पाचही तरुण पाण्याच्या कडेला मद्यप्राशन करत बसले होते. स्थानिक नागरिकांनी ही जागा धोकादायक असून येथे पाण्यात जाऊ नका असे सांगितले होते. तसेच सोनापूर ग्रामपंचायतीने सदर ठिकाणी बोर्डही लावलेला आहे. असे असताना यातील दोन तरुण नशेत पाण्यात उतरले व त्यांचा बुडून मृत्यू झाला.