esakal | शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी; अमोल कोल्हे भडकले
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अमोल कोल्हे.

शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी; अमोल कोल्हे भडकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने सुरू केलेले शिवसंपर्क अभियान हे पक्षवाढीसाठी नसून, फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी राहिलेली नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर शरद पवार यांचा वरदहस्त आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे,’’ अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिवसैनिकांना सुनावले. (Uddhav Thackeray as CM because of Sharad Pawar Amol Kolhe erupted aau85)

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव व खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १७) करण्याचे खासदार कोल्हे यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यापूर्वीच शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी आढळराव पाटील यांनी या कामाचे उद्‍घाटन केले. त्यावेळी त्यांनी व उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हे व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. दरम्यान, शनिवारी कोल्हे यांनी पूर्वनियोजनानुसार या कामांचे उद्‍घाटन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हस्ते केले. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘माजी खासदारांविषयी मला आदर आहे. नारायणगाव व खेड बाह्यवळण रस्त्याच्या उद्‍घाटन कार्यक्रमाचे मी त्यांना निमंत्रण देणार होतो. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच उद्‍घाटन करून या कार्यक्रमाला राजकीय रंग दिला. वयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये. पद गेल्यानंतर ते वैफल्यग्रस्त व अस्वस्थ झाले आहेत’’

मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्यानं सत्तेत आहे?

पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे. तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका, असा सल्ला शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी कोल्हे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिला.

खासदार कोल्हे यांनी शिरूर येथे केलेल्या वक्तव्याचा कान्हेरे यांनी समाचार घेतला. अमोल कोल्हे म्हणतात, शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे? कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे. तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी-कधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले. आपण ज्या उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले असा टोलाही कान्हेरे यांनी लगावला.

loading image