esakal | आंतरराष्ट्रीय शिक्षणाला ‘बूस्ट’; UGC ने तयार केला आराखडा

बोलून बातमी शोधा

UGC plan to boost international education Benefits to 13 organizations in the state}

पुणे : भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांसोबत करार करण्यासाठी व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण प्राप्त करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नियमावली तयार केली आहे.

आंतरराष्ट्रीय शिक्षणाला ‘बूस्ट’; UGC ने तयार केला आराखडा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : भारतात उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांसोबत करार करण्यासाठी व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण प्राप्त करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नियमावली तयार केली आहे. यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये पहिल्या १०० मध्ये असलेल्या विद्यापीठांना जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचशेमध्ये असलेल्या विद्यापीठांशी करार करता येणार आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना दुहेरी पदवी, संयुक्त पदवी, पीएचडीसाठी मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील १३ संस्थांना याचा लाभ होणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात देशातील संस्कृती, परंपरा यांना महत्त्व देण्यात आलेले असले तरी त्याच सोबत आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठीही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ‘यूसीजी’ने नियमावली तयार करण्यासाठी समिती नियुक्ती केली होती. या समितीने याबाबतचा आराखडा तयार करून त्याचा अहवाल नुकताच सादर केला आहे. या समितीने तयार केलेल्या नियमावलीस ‘द अॅकॅडमिक कोलॅबोरेशन बिटविन इंडियन अँड फॉरेन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू ऑफर जॉइंट डिग्री, ड्युएल डिग्री अँड ट्विनिंग प्रोग्रॅम’ असे नाव देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांशी करार करताना ‘यूजूसी’ची मान्यता आवश्‍यक असणार आहे. यामध्ये चुकीच्या पद्धतीने अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असेही यात नमूद केले आहे. या मसुद्यावर हरकती, सूचना नोंदविण्यासाठी ५ मार्च पर्यंतची मुदत ‘यूजीसी’ने दिली आहे.

कोणाला होऊ शकतो फायदा
‘एनआयआरएफ’ रॅंकिंगमध्ये पहिल्या १०० मध्ये असलेल्या शिक्षण संस्था, तसेच केंद्र सरकारकडून इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स दर्जा प्राप्त संस्था यासाठी पात्र असतील. त्यांना टाइम्स हायर एज्युकेशन (टीएई), क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीतील पहिल्या पाचशे विद्यापीठांशी सहयोग करार करता येईल.


प्रमाणपत्रावर परदेशी बोधचिन्ह
भारतातील उच्च शिक्षण संस्था व आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेत संयुक्त पदवी अभ्यासक्रम राबविताना या दोन्ही संस्थांनी मिळून अभ्यासक्रम निर्मिती करणे आवश्‍यक आहे. पदवी प्रमाणपत्र देताना त्यावर दोन्ही संस्थांचे बोधचिन्ह असणे आवश्‍यक असणार आहे. तर दुहेरी पदवीमध्ये भारतातील आणि परदेशातील शिक्षण संस्थेकडून स्वतंत्रपणे पदवी प्रदान केली जाईल. ट्विनिंग प्रोग्रॅममध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा काही भाग भारतात तर काही भाग परदेशात शिकता येईल. पीएच.डी. करताना दोन्ही संस्थांमधील मार्गदर्शक असणे आवश्यक आहे.


पुणे विद्यापीठाने पूर्वीपासून परदेशी संस्थांशी शैक्षणिक करार केलेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाशी बीएस्सी ब्लेंडेडचा हा पदवीचा करार आहे. यूजीसीची ही नियमावली अन्य विद्यापीठासाठी उपयुक्त ठरेल.’’
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

‘एनआयआरएफ’ टॉप १०० मध्ये महाराष्ट्र (२०२०)
संस्था - रँक - शहर
पुणे विद्यापीठ - ९ - पुणे
होमीबाबा नॅशनल इन्स्टिट्यूट - १४ - मुंबई
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी - १८ - मुंबई
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स - ३४ - मुंबई
सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी- ४३ - पुणे
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ - ४६ - पुणे
नर्सी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज - ५७ - मुंबई
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स - ६१ - वर्धा
भारती विद्यापीठ - ६३ - पुणे
मुंबई विद्यापीठ - ६५ - मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - ६९ - औरंगाबाद
पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ - ७७ - मुंबई
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स - ९० - कराड