

पळसदेव, ता. ३१ : जलसंपदा विभागाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या उजनी धरणातील मासेमारीचा खासगी ठेका व सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. ३१) पळसदेव (ता. इंदापूर) येथील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मच्छिमारांनी जलसमाधी आंदोलन केले.
‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्ची खाली करा...!’, ‘उजनी वाचवा, पाणी व पर्यावरण वाचवा’, ‘मत्स्यव्यवसाय वाचवा, मच्छिमारांचे हक्क अबाधित ठेवा’ अशा घोषणा देत मच्छिमार पाण्यात उतरले. यावेळी खोल पाण्यात उतरल्यामुळे तीन महिलांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना पाण्याबाहेर काढून इतर महिलांनी त्यांना धीर दिला. उजनी धरणाच्या कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारत १५ सप्टेंबरपूर्वी चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
दरम्यान, उजनी धरणातील मासेमारीचा खासगी ठेका व सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याबाबत स्थानिक मच्छिमार आक्रमक झाले आहेत. मच्छिमारांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्याने, खासगी ठेकेदाराला उजनीत पाय ठेवू द्यायचा नाही असा निश्चय मच्छिमारांनी केला आहे. यासाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
दरम्यान, उजनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे, उपविभागीय अभियंता नितीन खाडे, विलास देशमुख आदींनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक आयोजित करून चर्चा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. दरम्यान, आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी इंदापूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
महिलांसोबत मुलांचीही उपस्थिती
पळसदेव येथे मच्छिमार बांधव महिला-मुलांसोबत शेकडोंच्या संख्येने येथे हजर होते. घोषणाबाजी करत मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा मच्छिमारांनी घेतला होता. महिला व पुरुष पाण्यात उतरून घोषणाबाजी करत होते.
03688, 03687
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.