

नीरा नरसिंहपूर, ता. २५ : गणेशवाडीतील (ता. इंदापूर) उजनी धरणातून भीमा नदीत शनिवारी पहाटे दोन वाजता तीन हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले तर रविवारी (ता. २५) सकाळी ७.३० वाजता विसर्ग वाढवून चार हजार ५०० क्युसेक करण्यात आला. त्यामुळे भीमा नदीचे पात्र पाणी सोडल्यानंतर खळखळून वाहत आहे. दुष्काळात जानेवारीपर्यंत नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
भीमा नदीवरील इंदापूर तालुक्यातील भांडगाव, बावडा, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टणू आणि नरसिंहपूर तर माढा तालुक्यातील आलेगाव, रुई, गारा, अकोले, टाकळी, चांदज, शेवरे आदी गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. तसेच नदीकाठावरील गावात असणाऱ्या विहिरी व कूपनलिका यांची पाणीपातळीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणीप्रश्न जानेवारीपर्यंत तरी मार्गी लागला असल्याचे बोलले जात आहे. तिन्ही बंधारे ढापे टाकून पाणी अडवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भीमा नदीपात्रातील सिंचन व वीज प्रश्नांसाठी आलेगाव खुर्द येथे शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईने तूर्तास स्थगित करण्यात आले. त्यानंतर विसर्ग सोडण्यात आला
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात शनिवारी पहाटे दोन वाजता १४०० क्युसेक तर वीज निर्मितीला १६०० असे ३००० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामध्ये सकाळी साडेसात वाजता वाढ केली.
सोलापूर जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या समन्वयाने आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आलेगाव-भांडगाव बंधाऱ्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. मायनर क्रमांक पाच कालव्याची दुरुस्ती होईपर्यंत नदीपात्रात ५० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून टणू - टाकळी, रुई-भाटनिमगाव व नरसिंहपूर-शेवरे येथील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जातील. तसेच शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यात कपात न करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
पंढरपूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आंदोलन स्थगित केले. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
उजनीत ४१ टीएमसी उपयुक्त साठा
उजनी धरणात सध्या एकूण १०५ टीएमसी पाणीसाठा असून, त्यापैकी ४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. पुढील आठ दिवसांत उपयुक्त पाणीसाठा सुमारे ३५ टीएमसी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी धरणाची पाणीपातळी ७७ टक्के होती.
05755
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.