

इंदापूर ता. ५ : इंदापूर तालुक्यातील उजनी पट्ट्यातील माळवाडी येथे उजनी जलाशयातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करणाऱ्या तीन बोटी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून जीलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त करत जलसमाधी दिल्या. यामध्ये वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. बारामतीचे उपविभागीय अधिकारी बारामती उत्तम दिघे व तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार स्वाती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
उजनी जलाशयाच्या पात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उजनी पट्ट्यातील माळवाडी परिसरात महसूल पथकाने पाहणी केली असता अवैध वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटी आढळून आल्या. महसूल विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी जलाशयातच जलसमाधी दिल्या. या कारवाईमुळे उजनी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, उजनी जलाशयातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने केलेल्या या कारवाईचे परिसरातून स्वागत होत आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने अशाच प्रकारे सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या कारवाईत इंदापूर महसूल पथकातील मंडळ अधिकारी पांडुरंग कोळगे, माळवाडीचे मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, वैभव मुळे, भास्कर घोळवे यांनी सहभाग घेतला. तसेच पोलिस पाटील अरुण कांबळे व सुनील राऊत यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
उजनी जलाशयातून अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल विभागाकडून यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
- जीवन बनसोडे, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.