

उजनी धरणावरील खासगी
मासेमारीचा ठेका रद्द
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्याची ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन सोमवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
उजनी धरण परिसरातील हजारो मच्छीमार कुटुंबांचा मासेमारी व्यवसाय हा त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. खासगी ठेकेदारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने इंदापूर तालुक्यातील मच्छीमार संघटना, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती आणि उजनी मच्छीमार बचाव अभियान यांनी या ठेका प्रक्रियेला विरोध केला होता. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे उजनी धरणातील खासगी मासेमारी ठेका रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच मंगळवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाव’ आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.
मच्छीमारांच्या मागणीची दखल घेत कृषिमंत्री भरणे यांनी उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देऊन ती रद्द करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. मच्छीमारांची उपजीविका आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचे भवितव्य लक्षात घेऊन आज संबंधितांची बैठक घेण्यात आली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस ऑनलाइन हर्षवर्धन पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार संजय शिंदे, प्रधान सचिव एकनाथ डवले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. चोपडे, जलसंपदा विभाग, पुणेचे मुख्य अभियंता प्रवीण कोल्हे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि मच्छीमार समाजाचे उज्ज्वला परदेशी, संजय दरदरे, चंद्रकांत भोई, बाळासाहेब काळे, अनिल नगरे, सीताराम नगरे, नंदकुमार नगरे, लक्ष्मण शिर्के, नितीन ईरीचे, युवराज नगरे, नवनाथ परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उजनी धरणावर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने इंदापूर तालुक्यासह उजनी धरण परिसरातील मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयासाठी मच्छीमार बांधवांनी कृषिमंत्री भरणे यांचे आभार मानले.
फोटो ओळ :
मुंबई ः उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्याची ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मच्छीमारांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.