रशियाच्या हल्ल्यात २६ ठार

रशियाच्या हल्ल्यात २६ ठार
Published on: 

रशियाच्या हल्ल्यात २६ ठार

युक्रेनच्या दक्षिण भागातील मदत केंद्रावर हल्ला, अनेक जण बेपत्ता

किव्ह, ता. ३ (पीटीआय) : युक्रेनच्या दक्षिण भागातील मदत वितरण केंद्र आणि निवाऱ्यावर रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्यांखाली ४८ जण बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
झापोरेशिया भागातील कोमिशवाखा गावामध्ये ही घटना घडली. एका शाळेच्या इमारतीमध्ये हे मदत वितरण केंद्र स्थापन करण्यात आले होते. रशियाने या हल्ल्यासाठी १० ग्लाइड बॉम्बचा वापर केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. रशियाला या केंद्रातून मानवतावादी मदत करण्यात येत होती, याची पूर्ण माहिती रशियाला होती, असा आरोप युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमीर झिलेन्स्की यांनी याविषयी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केला आहे. ‘मदत केंद्रावर पहिल्यांदा हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर तेथून जवळच असलेल्या एका निवाऱ्याला लक्ष्य करण्यात आले. यातून रशियाला तणाव कमी व्हावा, असे वाटत नाही, हे सिद्ध होते. ओलेश्की गावामध्ये ही शस्त्रसंधी करण्यात आली होती. या गावातील शस्त्रसंधीवरून त्यांच्यासाठी संधी होती. मात्र, रशियाने युक्रेनच्या नागरिकांना मारणे सुरूच ठेवले आहे,’ असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या पुढाकाराने पुढील आठवड्यात रशिया व युक्रेन यांच्यात चर्चा पुन्हा सुरू होणार आहे, असे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांनी सांगितले. ही चर्चा १० आणि ११ नोव्हेंबर रोजी अबुधाबी येथे होत आहे.

ओलेश्कीची शस्त्रसंधी संपुष्टात
दक्षिण भागातील ओलेश्की गावामध्ये दोन्ही बाजूंकडून सुरू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात आली आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प यांच्या पुढाकारातून ही शस्त्रसंधी करण्यात आली होती. या गावामध्ये दोन हजारांपेक्षा जास्त नागरिक अडकले असून, सुरूंग आणि ड्रोन यांच्यामुळे ते प्रचंड बिकट अवस्थेमध्ये होते. त्यांच्यापर्यंत मानवतावादी मदत पोहोचविण्यासाठी ही शस्त्रसंधी करण्यात आली होती. दोन्ही देशांतील युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पाच वर्षांमधील हा सर्वांत मोठा शांततेचा काळ होता, असे सांगण्यात येते. अन्य कोठेही अशा प्रकारे शस्त्रसंधी करण्याचा विचार नाही, असे रशियाने म्हटले आहे. तर, या काळामध्ये रशियाने त्यांचा दारूगोळा आणि ड्रोनचा साठा पूर्ववत केल्याचा आरोप युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.


सायबर हल्ल्यानंतर आणीबाणीचे संदेश
युक्रेन आणि रशियातील मोबाइल फोनवरील सरकारी ॲपवर आणीबाणीचे संदेश आल्याचे नागरिकांनी सांगितले. युक्रेनमधील नागरिकांना अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा देणारेही संदेश आले होते. ॲप हॅक झाल्यामुळे खोटे मेसेज आल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले. हा सायबर हल्ला एकाच व्यक्तीकडून झाला का, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.