

पुणे, ता. ३० ः ‘‘आई-वडिलांचे संस्कार, बाळासाहेब भारदे व यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांचा सहवास आणि वारकरी संप्रदायातून मिळालेला सत्संग, या त्रिसूत्रीमुळे माझे जीवन यशस्वी झाले,’’ अशी भावना माजी आमदार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केली. वयाची ८१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल विदिशा विचार मंच व कोहिनूर कट्टाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पवार यांना गौरविण्यात आले. यावेळी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, गीत रामायण निरूपणकार व गायक आनंद माडगूळकर, सीए सारिका जोगळेकर आणि विदिशा विचार मंच, पुणेच्या संस्थापक- संचालक ममता क्षेमकल्याणी आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘लहानपणापासून श्रवणभक्तीची आवड असल्याने विविध पक्षांच्या नेत्यांची भाषणे ऐकली. समोरच्या व्यक्तीच्या मुद्द्यांचे खंडन करताना ही सवय राजकीय कारकिर्दीत उपयुक्त ठरली,’’
राजकारणी सर्वज्ञ नसला, तरी सर्वस्पर्शी असला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
गोयल म्हणाले, ‘‘उल्हासदादांना राजकारणात कोणतेही मंत्रिपद मिळाले नसले, तरी त्यांचा विविध क्षेत्रातील दबदबा लक्षात घेता, ते महाराष्ट्राचे तहहयात सांस्कृतिक मंत्री आहेत, असेच म्हणावे लागेल.’’
फुटाणे म्हणाले, ‘‘बाभुळीचे सुबाभुळ, रामकाठी बाभुळ आणि वेडी बाभुळ असे विविध प्रकार फोफावत असताना उल्हासदादा मात्र राजकारणात कायमच सोनचाफ्याचे झाड बनून दरवळत राहिले आहेत.’’
तर डॉ. मोरे म्हणाले, ‘‘काँग्रेसचा सुवर्णकाळ पाहिलेला शेवटचा शिलेदार म्हणून उल्हासदादांचा उल्लेख करावा लागेल. राजकारणात एवढी वर्षे योगदान देऊनही आणि हवे ते पद न मिळूनही त्यांनी त्यांची पत, सत्ता आणि आदर हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरच मिळवलेला आहे.’’
आनंद माडगूळकर म्हणाले, ‘‘उल्हासदादांशी आमचे अनेक वर्षांचे घरोब्याचे संबंध असून, गदिमांच्या अतिशय आवडत्या व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान अगदी वरचे होते.’’
ममता क्षेमकल्याणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. समन्वयक नितीन जळूकर यांनी आभार मानले.
------
फोटो ः 45934
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.