

उंब्रजला भरदिवसा बाजारपेठेतील
ज्वेलर्स दुकानातून ऐवज लंपास
दोघे चोरटे दुचाकीवरून पसार; साडेसतरा हजारांचे दागिने
उंब्रज, ता. ३० : येथील बाजारपेठेतील गांधी ज्वेलर्स दुकानातून दोघा अनोळखी चोरट्यांनी सुमारे १७ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. हिरालाल चुनीलाल गांधी (वय ६३, रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) यांनी पोलिसात याबाबत तक्रार दिली.
पोलिसांची माहिती अशी, गांधी यांचे येथील बाजारपेठेत सोने-चांदी खरेदी-विक्रीचे दुकान आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून त्यांच्या दुकानात आले. यावेळी संधी साधून त्यांनी दुकानातील सुमारे १२ हजार रुपये किमतीची ७६० मिलिग्रॅमची सोन्याची बाळी, तसेच सुमारे पाच हजार ३०० रुपये किमतीचे ३४० मिलिग्रॅमचे सोन्याचे बदाम असा एकूण १७ हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरीच्या घटनेनंतर दोन्ही संशयित दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी दोघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. हवालदार रसाळ तपास करत आहेत.
...................................