संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक बैठकीला सुरुवात

संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक बैठकीला सुरुवात
Published on

संयुक्त राष्ट्र आमसभेच्या
वार्षिक बैठकीस सुरुवात

जागतिक अस्थिरता, संघर्षमय अन् अनिश्चिततेची पार्श्वभूमी

न्यूयॉर्क, ता. २२ (वृत्तसंस्था) : जागतिक सद्यःस्थितीबाबत मुत्सद्द्यांत फारसे एकमत राहिले नसले तरी जगात अस्थिरता असल्याबद्दल मात्र सर्व जण सहमत आहेत. युरोप आणि पश्चिम आशियातील तीव्र होत चाललेले दोन युद्धसंघर्ष, बदलती जागतिक अर्थव्यवस्था आणि वेगाने बदलणारी जागतिक सत्तासमीकरणे यांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक आमसभेसाठी राष्ट्रप्रमुख, सरकारप्रमुख आणि मंत्री मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले.

“जगाचे नेते सखोल अनिश्चिततेच्या काळात संयुक्त राष्ट्रांत एकत्र येत आहेत. त्याचवेळी सत्तासमीकरणे बदलत आहेत. जग बदलत आहे आणि त्यानुसार आपल्या संस्थांमध्येही बदल होणे आवश्यक आहे,” असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी अलीकडेच पत्रकारांशी बोलताना म्हटले. गेल्या नऊ महिन्यांतच जगाने अनेक धक्कादायक घडामोडी अनुभवल्या. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना सत्तेतून हटविण्यासाठी लष्करी कारवाई केली. त्यानंतर इराणमध्ये सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या हजारो नागरिकांवर कारवाई झाली.

पुढे अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केला आणि त्यातून सुरू झालेला संघर्ष अद्यापही वाढत आहे. या संघर्षात पश्चिम आशियातील जवळपास सर्वच देश कोणत्या ना कोणत्या प्रकारे गुंतले असून, त्याचा परिणाम एका महत्त्वाच्या जलमार्गाच्या प्रत्यक्ष बंद होण्यात झाला आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. उलट, गेल्या काही दिवसांत दोन्ही बाजूंनी हल्ले अधिक तीव्र केले आहेत. युद्ध थांबविण्यासाठी झालेल्या अनेक राजनैतिक प्रयत्नांनाही अद्याप निर्णायक यश आलेले नाही.

मे महिन्यात काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडामध्ये इबोलाचा उद्रेक झाला. त्यामुळे पुढील संभाव्य साथीच्या आजाराला तोंड देण्यासाठी जगाची तयारी किती अपुरी आहे, याबाबत प्रश्न निर्माण झाले. व्हेनेझुएला आणि कोलंबियातील प्राणघातक भूकंप तसेच नेपाळ आणि तिबेटमधील मोठ्या प्रमाणावरील अचानक आलेल्या पुरांमुळे मानवनिर्मित जागतिक तापमानवाढीने जीवित अन् वित्तहानीचा वाढता दुष्परिणामही अधोरेखित झाला.

वार्षिक आमसभेपूर्वी विविध देशांतील विद्यमान आणि माजी मंत्री, राजदूत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वृत्तसंस्थेने संवाद साधला. आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत मुक्तपणे बोलता यावे यासाठी यातील काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर आपली मते व्यक्त केली. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय समुदायासमोरील संकटे वाढत असून, संयुक्त राष्ट्रे आणि त्यांचे १९३ सदस्य देश या संकटांना सामोरे जाण्यास कितपत सक्षम ठरतील, हा गंभीर प्रश्न आहे. अमेरिकेचे माजी राजदूत रॉबर्ट वूड म्हणाले, “यातील काही प्रश्न मुत्सद्देगिरीच्या मार्गाने सोडवता येतात का, हे आजमावून पाहण्याची ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. संयुक्त राष्ट्रे निश्चितच एका निर्णायक वळणावर आहेत. गेल्या वर्षी परिस्थिती वाईट होती आणि यंदा ती फारशी सुधारलेली दिसत नाही.” एका युरोपीय मुत्सद्दी अधिकाऱ्यासह अन्य एका अधिकाऱ्यानेही याच मताला दुजोरा दिला. गेल्या वर्षाच्या तुलनेत जगाची स्थिती सुधारलेली नसून ती अधिक अस्थिर झाली आहे, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कायद्यावरील विविध हल्ले, मध्यस्थीच्या प्रयत्नांचा झालेला ऱ्हास किंवा त्यांचा अभाव अन् हवामानबदल तसेच शांतता व सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर जागतिक सहमती न होणे, या बाबी त्यांनी अधोरेखित केल्या.

ट्रम्प, झेलेन्स्की, पेझेश्कियन यांच्या भाषणाकडे लक्ष

संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्या भाषणांकडे जगाचे लक्ष असेल. तसेच विविध देशांचे अधिकारी बैठकीच्या निमित्ताने मित्रदेश तसेच प्रतिस्पर्धी देशांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा करण्यावरही भर देणार आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी सुरक्षेपासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनियंत्रित विस्तारापर्यंतच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी या चर्चांचा उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com