

अनधिकृत खोदकामप्रकरणी केबल कंपनीला दंड
जामखेडमधील चार रस्त्यांच्या नुकसानीपोटी ८५.७८ लाखांची वसुली होणार
जामखेड, ता. १७ ः केबलसाठी राज्यमार्ग खोदकाम करणाऱ्या हरियानाच्या ''पीटूपी'' कंपनीला ८५ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याच्या मध्य भागापासून १५ मीटरच्या आत खोदकाम करून हरियानाच्या गुरूग्राम येथील पीटूपी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ऑप्टिकल फायबर केबल टाकली. त्यामुळे रस्त्याच्या डांबरी भागाचे व साईडपट्टयाचे मोठे नुकसान झाले. वाहतूकीस अडथळा व अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी पीटूपी नेटवर्क कंपनीला ८५ लाखांचा दंड आकारला असून, तो १५ दिवसांत भरण्याची नोटीस पाठवली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी पी.टू.पी. नेटवर्क कंपनीला जामखेड करमाळा रस्ता, कुसडगाव-रत्नापूर-हळगाव-चोंडी रस्ता, राज्यमार्ग ते पाडळी फाटा, जामखेड खर्डा भूम रस्ता अशा चार रस्त्यांसाठी परवानगी दिली होती. मात्र, रस्त्याच्या हद्दीबाहेर खोदकाम करणे, रस्त्याची साईडपट्टी व डांबरी पृष्ठभागाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित भागाची पूर्ववत स्थितीत पुनर्स्थापना करण्याची अट होती. त्याचे पालन करणे बंधनकारक करूनच या खोदकामास परवानगी देण्यात आली होती. परंतु सदर कंपनीने अटी-शर्तीचे पालन न केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागास निदर्शनास आले. याबाबत जामखेड कार्यालयाने वेळोवेळी अनधिकृत खोदकाम करू नये म्हणून पत्र देवून, वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र सबंधीत कंपनीने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले होते.याबाबत उपअभियंता शशिकांत सुतार यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला होता.
------------------
दंडात्मक कारवाई याप्रमाणे
जामखेड ः खर्डा-भूम रस्ता ः ३०१००००
चौंडी-हाळगाव-कुसडगाव-रत्नापूर रस्ता ः २४२५०००
जामखेड-करमाळा रस्ता ः १८९३८९१
रामा ४०८- पाडळी फाटा रस्ता ः १२५०९४८
-------
कंपनीला दिलेल्या सर्व परवानग्या रद्द
सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व परवानग्या रद्द करून रस्त्यावर कोणतेही काम करता येणार नाही.असे आदेश देतानाच, शासकीय मालमत्तेच्या नुकसानीच्या अनुषंगाने कामापोटी जमा करण्यात आलेली अनामत रक्कम व बँक गॅरंटी जप्त करून नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी ८५ लाख ७८ हजार ८८९ रुपये १५ दिवसांत भरण्याची नोटीस पीटूपी नेटवर्क कंपनीला दिली आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.