मशागत ः गीता भावसार

मशागत ः गीता भावसार
Published on

मशागत ः गीता भावसार

नवी पिढी समजून घेताना...
----------------
‘आमच्या काळात असं नव्हतं,’ हे वाक्य प्रत्येक पिढीला पुढच्या पिढीबद्दल सहज म्हणावंसं वाटतं. एकीकडे आपण असा प्रश्न करतो आणि दुसरीकडे आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी लगोलग पुरवण्याकडे आपला कल असतो. पण प्रश्न असा आहे, की खरंच नवीन पिढी बिघडली आहे का? की जग बदललंय आणि त्या बदलाबरोबर माणसाच्या जगण्याची, विचार करण्याची आणि नातेसंबंधांकडे पाहण्याची पद्धतही बदललीय? नवीन जनरेशनकडे पाहताना ‘ही मुलं आमच्यासारखी का नाहीत?’ हा प्रश्न विचारण्यापेक्षा ‘ही मुलं ज्या जगात वाढली आहेत, ते जग आमच्यापेक्षा किती वेगळं आहे?’ हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. कारण पिढ्या बदलतात तेव्हा फक्त कपडे, भाषा किंवा तंत्रज्ञान बदलत नाही. यशाची व्याख्या, स्वातंत्र्याची कल्पना, नात्यांची रचना आणि स्वतःकडे पाहण्याची दृष्टीही बदलते.

नव्या पिढीला समजून घेण्याची सुरुवात त्यांच्या सवयींपासून नाही, तर त्यांच्या जगण्याच्या संदर्भापासून करायला हवी. यांचा जन्मच डिजिटल युगात झालाय. पूर्वी माहिती मिळविण्यासाठी पुस्तक, शिक्षक किंवा अनुभवी व्यक्ती यांच्यावर अवलंबून राहावं लागायचं. आज एका क्षणात जगभरातली माहिती त्यांच्या हातात येते. त्यामुळे केवळ ‘आमचं ऐका’, ‘मी म्हणेन तेच अंतिम सत्य’ हे त्यांना पटत नाही. त्यांना ‘का?’ या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. त्यांच्यालेखी आज्ञेपेक्षा संवाद महत्त्वाचा आहे. पूर्वी मोठ्यांचा अनुभव म्हणजे अंतिम सत्य मानलं जायचं. आजची पिढी अनुभवाचा आदर करते, पण प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारत नाही. हा बदल अनेकदा उद्धटपणा म्हणून पाहिला जातो. प्रत्यक्षात त्यामागे स्वतंत्र विचार करण्याची इच्छा असते. अर्थात, प्रश्न विचारणे आणि प्रत्येक गोष्ट नाकारणे यात फरक आहेच. तोही समजून घेतला पाहिजे.
मोबाइल आणि सोशल मीडिया हे त्यांच्यासाठी केवळ मनोरंजन नसून, ते शिक्षण, संवाद, काम, मैत्री, व्यवसाय आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची माध्यमंही आहेत. मात्र याच माध्यमामुळे सततची तुलना, इतरांच्या आयुष्याचं आकर्षक चित्र पाहून निर्माण होणारी असमाधानाची भावना आणि प्रत्येक गोष्ट लगेच हवी, कष्ट न करता हवी ही सवयही वाढतेय. त्यामुळे प्रश्न ‘मोबाइल वापरायचा की नाही?’ हा नसून ‘मोबाइल कसा वापरायचा हा आहे. या ठिकाणी त्यांना मोठ्यांच्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.’
या नव्या मुलांना मैत्री, प्रेम, व्यक्तिगत अवकाश आणि मानसिक समाधान या गोष्टींना अधिक महत्त्व द्यायचंय. अनेक गोष्टींबद्दल ते उघडपणे बोलतात, ज्या पूर्वीच्या पिढ्यांनी दडपून ठेवल्या. यात काही अतिरेक असू शकतात; पण त्याचबरोबर प्रामाणिकपणे स्वतःच्या भावनांना स्वीकारण्याची सकारात्मक बाजूही आहे.
नवीन पिढी परिपूर्ण नाही. तिच्यात अधीरता आहे, तंत्रज्ञानावर अवलंबित्व आहे, कधी कधी जबाबदारीपासून पळण्याची प्रवृत्ती आहे. पण प्रत्येक पिढीच्या मर्यादा असतात. त्याच वेळी तिच्यात प्रश्न विचारण्याची हिंमत, नवीन शिकण्याची क्षमता, बदल स्वीकारण्याची तयारी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा आहे. या प्रचंड ऊर्जेला कोंडून ठेवण्याऐवजी योग्य वाट करून देण्यासाठी पालकशिक्षक आणि एकूणच आधीच्या फळीने प्रयत्न करायला हवा.
त्यांना दुरून judge करण्याऐवजी जवळून समजून घेण्याची गरज आहे. समजून घेणे म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देणे नव्हे. योग्य-अयोग्य सांगताना त्यांचा आवाज ऐकणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे आणि त्यांना स्वनिर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन देणे याचा विचार केला पाहिजे.
एकमेकांना विरोध करण्यापेक्षा एकमेकांच्या सकारात्मक गोष्टींची सांगड घालता आली तर सगळ्यांचा प्रवास आनंददायी होईल. जुन्या पिढीकडे अनुभव आहे आणि नवीन पिढीकडे नव्या जगाची समज आणि ऊर्जा. या दोन्हींचा संगम झाला, तर नवीन पिढीला आपल्या मतानुसार बदलविण्याच्या नाही तर घडविण्याच्या संधीचं सोनं करता येईल.
--------------
गीता भावसार
geetabhawsar@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com