
मजूरअड्ड्यांवर कामाची वाट पाहत तिष्ठत उभे असलेले मजूर लॉकडाउनचे भयाण वास्तव आपल्यासमोर आणत आहे. मूळच्या हैदराबादच्या असलेल्या मराठी भाषिक मंगला चव्हाण बुधवारी दुपारपर्यंत कात्रज कोंढवा रस्त्यावर कामासाठी उभ्या होत्या.
जगण्याच्या लढाईला कोरोनाचे ग्रहण! वर्षभरानंतरही मजूरांना मिळेना रोजगार
पुणे : लॉकडाउनच्या वर्षपूर्ती नंतरही मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. सारा देश ‘अनलॉक’ झाला मात्र मजुरांची रोजंदारी अजूनही ‘लॉक’ आहे. रोज सकाळी काम मिळाले तरच संध्याकाळी घरात चूल पेटेल, अशी दयनीय अवस्था सध्या मजुरांची झाली आहे. मजूरअड्ड्यांवर कामाची वाट पाहत तिष्ठत उभे असलेले मजूर लॉकडाउनचे भयाण वास्तव आपल्यासमोर आणत आहे. मूळच्या हैदराबादच्या असलेल्या मराठी भाषिक मंगला चव्हाण बुधवारी दुपारपर्यंत कात्रज कोंढवा रस्त्यावर कामासाठी उभ्या होत्या. त्या म्हणतात, ‘‘सकाळपास्न इथं उभी हाय अजून काम मिळालं नाही. आज काम मिळालं तर घरंच भागू शकतं. लॉकडाउनच्या भीतीनं कामच मिळत नाही. आमच्या सारख्या हातावर पोट असणाऱ्यांनी आता कुठ जायचं.’’ शहरात विविध ठिकाणी, रस्त्यांवर, मजुर अड्ड्यावर कामगार कामाच्या प्रतिक्षेत आहे. पण लॉकडाउनच्या परिणामामुळे ठेकेदार किंवा संबंधित व्यावसायिकांकडे कामच उपलब्ध नसल्याचे दिसते. एका अड्ड्यावर शेकडोनी लोकं उभी असतात.
उस्मानाबादहून पुण्यात रोजंदारीसाठी आलेले राघोबा उघडे म्हणतात, ‘‘आज ठेकेदार आला तरच काम मिळेल. सकाळपासून इथे उभे आहोत. फार कमी लोकांना आजकाल काम मिळते. एकवेळ कोरोना बरा पण ही भुकमरी नको. घर खर्च कसा भागवायचा मोठा प्रश्न आहे.’’ लॉकडाउनची भीती कमी करून सरकारने उद्योग, व्यवसाय आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मजूर अड्यांवर काय घडते?
- भल्या सकाळी मजूर रोजगार मिळविण्यासाठी रस्त्यांवर उभे राहतात
- बहुतेक कामगार परराज्यातील मराठी भाषिक, मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणचे असतात
- बांधकाम, इतर व्यावसायिक आदींचे ठेकेदार गरजेनुसार मजूरांना कामावर नेतात
- ज्या मजूरांना रोजगार मिळत नाही असे दुपारी एक वाजता घरी जातात
- मजुरांसोबत त्यांचे लहान मुलेही असतात
सध्या मजुरांच्या समस्या
- दररोज रोजगार मिळत नाही
- घराचे भाडे, रोजचा किराणा आणि गावाकडे पैसे पाठवणं अशक्य
- लॉकडाउनच्या भीतीमुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत
- मुलाबाळांच आजारपण भागविणे अवघड झालंय
या उपाययोजना आवश्यक ः
- कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन करणे सध्या अशास्त्रीय पर्याय असल्याचे तज्ज्ञ सांगतात
- त्यामुळे लॉकडाउनची टांगती तलवार सरकारने काढून घ्यावी
- पर्यायी बांधकाम, हॉटेल, इतर व्यवसायांना उभारी मिळेल
- मजुरांना रोजगार मिळेल असे वातावरण आता आवश्यक झाले आहे.
- अत्यावश्यक वस्तू, धान्य आदींचा पुरवठा करावा
''सकाळपास्न आलेत. अजून काम मिळालं नाही. एक वाजेपर्यंत थांबणार मिळालं तर ठिक नाहीतर घरी जावं लागेल. सांगा बर आमच्या सारख्या हातावर पोट असणाऱ्या लोकांनी कुठं जायाचं. आज मिळालं काम तर संध्याकाळी पोटाला खायला मिळल. रोज भात, डाळीवरच आहे. आमच्याकडे कोणाचंच लक्ष नाही.''
- शांता मेगावत, स्थलांतरीतमजूर, आंध्रप्रदेश
विश्रामबाग वाडा अंधारात; पुणे महापालिकेने वीजबिलच भरले नाही
आकडे बोलतात....
- पुणे जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतर करणारे लोक ः १२ लाख
- यातील राज्यातील मजूर ः ८५ टक्के
- सध्या मजूर अड्डयावर उभ्या असलेल्या इतक्या टक्के लोकांना मिळते काम ः २० ते ३५ टक्के
- लॉकडाउनच्या भितीमुळे रोजगार कमी झाला ः ७४ टक्के मजूरांचे मत
(स्त्रोत ः सर्वायव्हल ऑफ मायग्रंट इन क्रायसेस- फ्लेम विद्यापीठ)
Web Title: Unemployment Workers Outside City Majur Adda
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..