

मध्य भारत
समान नागरी कायद्याच्या
मसुद्यासाठी समिती
रायपूर : छत्तीसगड सरकारने राज्यात समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांच्या कार्यालयाने यासंदर्भातील अधिसूचना ‘एक्स’वर शेअर केली. विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा, दत्तक आणि संबंधित कायद्यांचा अभ्यास करून समिती शिफारशी करणार आहे. नागरिक, सामाजिक संस्था व कायदेतज्ज्ञांची मतेही घेतली जाणार आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यात कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्यात येईल, असे सांगितले.
---
ईशान्य भारत
जपान आसामशी
सहकार्य वाढवणार
गुवाहाटी : जपानने भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणांतर्गत आसामशी सुरू असलेले सहकार्य अधिक दृढ करण्याची वचनबद्धता व्यक्त केली असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘एक्स’द्वारे दिली. जपानचे भारतातील राजदूत ओनो केइची यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेत इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि उद्योजकता क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली. जपानी पंतप्रधान सानाए ताकाइची यांचा आसाम दौरा रद्द झाला असला तरी जपानी उद्योग प्रतिनिधीमंडळ लवकरच राज्याला भेट देणार असल्याचे सरमा यांनी सांगितले.
----
नक्षलवाद्यांचा
शस्त्रसाठा जप्त
नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जंगलातील दोन नक्षलवादी ठिकाणांवर कारवाई करून मोठा शस्त्रसाठा, दारुगोळा, स्फोटके आणि २४ लाख रुपये रोख जप्त केले. ओर्चा आणि छोटेडोंगर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे ही शोधमोहीम राबविण्यात आली. यात इन्सस व एसएलआर रायफल, .३०३ रायफल, ग्रेनेड लाँचर, डिटोनेटर, स्कॅनर आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने देण्याचे आवाहन केले आहे.
---
पूर्व भारत
वडिलांच्या नोकरीसाठी
मुलाकडून हत्येचा कट
धनबाद (झारखंड) : वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळावी म्हणून मुलानेच सुपारी देऊन वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार झारखंडमधील धनबाद येथे उघडकीस आला. पोलिसांनी ‘बीसीसीएल’चे मृत कर्मचारी तुलेश्वर नोनिया यांचा मुलगा विजय चौहान आणि दोन सुपारी घेणाऱ्या आरोपींना अटक केली. चौहानने दहा लाख रुपयांची सुपारी देण्याचे मान्य केले होते. आरोपींनी निर्जनस्थळी दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चेहरा विद्रूप करून मृतदेह रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव रचला.
----
ट्रक-व्हॅन अपघातात
आठ जणांचा मृत्यू
रामगड : झारखंडमधील रामगड जिल्ह्यात कोळशाने भरलेल्या ट्रकने बँड पथकाच्या व्हॅनला धडक दिल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री राजरप्पा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बरलौंग बुधबाजार परिसरात हा अपघात झाला. सुरुवातीला सात जणांचा मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीचा रांची येथील ‘रिम्स’ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन केले. राज्यपाल संतोष कुमार गंगवार आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
----
पश्चिम भारत
गोव्यात कोट्यवधींचे
सागरी प्रकल्प
पणजी : गोव्यातील सागरी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार दोन हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प राबविणार असून अत्याधुनिक वॉटर मेट्रो सेवाही सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत नव्या ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स’ इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. जहाजाच्या धर्तीवर उभारलेली ही इमारत गोव्याच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक असून ‘विकासही, वारसाही’ या संकल्पनेला बळ देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------
दिल्ली व परिसर
दहशतवादी कटप्रकरणी
आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली : बंदी घालण्यात आलेल्या जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘इमाम महमुदेर काफिला’ (आयएमके)ने आखलेल्या कटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. पश्चिम बंगाल व ईशान्य राज्यांमध्ये संघटनेची विचारधारा पसरवणे, युवकांचे कट्टरतावादीकरण करणे आणि भारतात जाळे विस्तारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. आसाममधील नसीमुद्दीन आणि त्रिपुरातील जागीर मिया हे प्रमुख आरोपी असून तपासात आक्षेपार्ह कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.