तेरा हजार हेक्टर जमिन सुपीक

तेरा हजार हेक्टर जमिन सुपीक
Published on

‘गाळमुक्त धरणा’तून तेरा हजार हजार हेक्टर जमीन सुपीक
-------
३९१६ घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा; ९३८ हेक्टरला वाढीव सिंचन
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
धाराशिव : सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेतून जिल्ह्यात मागील दोन वर्षात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे तिहेरी लाभ घडून आला आहे. धरणातील गाळाचा उपसा करून टाकल्यामुळे जिल्ह्यातील ११ हजार ६०७ शेतकऱ्यांची १३ हजार १३८ हेक्टर जमीन सुपीक झाली आहे. दुसरीकडे गाळाचा उपसा केल्यामुळे धरण व तलावांच्या पाणीसाठ्याचे पुनरुज्जीवन होऊन तीन हजार ९१६ घनमीटरने जास्त पाणी साठले तर या पाणीसाठ्यातून ९३८ हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी रत्नाकर महामुनी यांनी दिली.
या योजनेतून २०२३-२४ ते २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांत जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद विभाग आणि जलसंधारण विभागाच्या वतीने पाझर तलाव, साठवण तलाव, लघु व मोठे प्रकल्प आदी ३०२ प्रकल्पांतून सुमारे १७०.३८ लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. हा गाळ ११ हजार ६०७ शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये टाकण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची १३ हजार १३८ हेक्टर एवढी खडकाळ व मुरमाड जमीन सुपीक झाली आहे. दुसरीकडे गाळाचा उपसा झाल्यामुळे प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १३ हजार १५० टीसीएमने वाढली आहे. तर ९३८.९० हेक्टरचे वाढीव क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. योजनेवर आतापर्यंत ६० कोटी ४८ लाख रुपये खर्च झाला असून पात्र शेतकऱ्यांना गाळाचा उपसा करून शेतात टाकण्यासाठी २४ कोटी २३ लाख रुपयांचे अनुदानही थेट बँक खात्यावर जमा केली आहे. जमिनी सुपीक झाल्यामुळे पिकांच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली. नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे विहिरी व विंधनविहिरीच्या पातळीतही वाढ झाल्याचे महामुनी यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान २.० मधून सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडींग,सलग समतल चर, खोल सलग समतल चर, गॅबियन बंधारे, रिचार्ज शाफ्ट आणि नाला खोलीकरण आदी कामे करण्यात येत असून या कामांचा ७६ कोटी १४ लाख रुपये निधीचा आराखडाही मंजूर झाला असल्याचे महामुनी यांनी सांगितले.
--------
चौकट...
-------
१६३ गावांत जलयुक्त शिवार २.०
------
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यात १६३ गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेतून कृषी, जिल्हा परिषद, वन विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व जलसंधारण विभागाच्या वतीने कामे होणार आहेत. यात विशेष निधीतून एक हजार ३७४ तर अभिसरणाअंतर्गत ५ हजार ५४५ अशी एकूण ६ हजार ९१९ कामे मंजूर आहेत. या कामांसाठी ७६ कोटी १४ लाखाचा आराखडा मंजूर आहे. आजअखेर जिल्ह्यात ६ हजार ६९२ कामे पूर्ण झाली असून कामांमुळे भूजलपातळी व सिंचन क्षमतेत वाढ होऊन शेतीचे उत्पादन वाढल्याचेही जिल्हा जलसंधारण अधिकारी महामुनी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com