विनाकरण फिरताय, दुचाकी होईल जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

दुचाकी जप्तीची कारवाई १४ एप्रिलपर्यंत
याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, रस्त्यांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपआपल्या ठाण्याच्या हद्दीत वरील कारवाई काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्ते व गावागावांतील चौक अशा ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात केले आहे. अत्यावश्यक सेवा आणि अतिमहत्त्वाच्या कामांसाठीच बाहेर पडलेल्यांना कारवाईतून वगळणार आहे.

लोणी काळभोर - संचारबंदी लागू असतानाही कोणी विनाकारण दुचाकी घेऊन रस्त्यावर फिरत असेल, तर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच, दुचाकीही लॉकडाऊनचा काळ संपेपर्यंत जप्त करण्याचा आदेश जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी पोलिसांना दिला आहेत. अत्यावश्यक सेवा आणि अतिमहत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडलेल्यांना या कारवाईतून वगळणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, आदेश मिळाल्यापासून अवघ्या २४ तासांत म्हणजे सोमवारी (ता. ३०) दुपारपासून मंगळवारी दुपारपर्यंत लोणी काळभोर पोलिसांनी लोणी काळभोर चौक व उरुळी कांचन परिसरात पन्नासहून अधिक दुचाकी जप्त केल्या. दुचाकीवर फिरणाऱ्या शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले.

ते म्हणाले, पुणे- सोलापूर, हडपसर- सासवड व लोणीकंद ते केसनंदमार्गे थेऊर फाटा या तीन प्रमुख रस्त्यावर दुचाकींची वर्दळ वाढली आहे. आवाहन करूनही नागरिक विविध कारणे पुढे करून रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. यापुढील काळात कारवाई आणखी तीव्र करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. 

घोडेगावात ३८ वाहने जप्त
घोडेगाव - घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण मोटारसायकलवर फिरणा-या ३८ वाहनांवर कायदेशीर कारवाई करून जप्त करण्यात आल्या. लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत त्या पोलिस ठाण्यात ठेवण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले. विनाकारण फिरणे, रेंगाळणे, उभे राहणे, गप्पा मारत बसणे याला सध्या मनाई करण्यात आली आहे. परंतु तरीही नागरिक विनाकारण रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी गाडी घेऊन फिरत आहे. त्यांची नाकाबंदीमध्ये कडक तपासणी करण्यात येत आहे. ही कारवाई प्रदीप पवार, फौजदार अपर्णा जाधव व पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केली.

सासवडला पाच जणांना दणका 
गराडे - सासवड (ता. पुरंदर) शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या पाच वाहनचालकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केल्याचे सासवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी सांगितले. या कारवाईमध्ये भगीरथ घुले, जोतिबा भोसले, आर. जे. काळभोर, महेश खरात, कैलास सरक, डी. जे. गोडसे, सी. डी. झेंडे यांनी भाग घेतला.

राजगड पोलिसांकडून ३० जणांवर कारवाई 
खेड शिवापूर - रस्त्यावर विनाकारण फिरून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३०  दुचाकीस्वारांवर राजगड पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. तसेच, त्यांची दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

राजगड पोलिस ठाण्याच्या शिंदेवाडी, खेड शिवापूर, किकवी या दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात ही कारवाई केली. राजगडचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार संतोष तोडकर, संतोष कालेकर, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The unmanaged bike will be confiscated by police