ड्रोन नवे हवाई शस्त्र

ड्रोन नवे हवाई शस्त्र
Published on

‘ड्रोन’ यंत्रणेच्या रूपाने
हवाई दलाकडे नवी शक्ती

हवाई दलप्रमुख : मानवरहित विमाने आकाशातील घातक ‘पंजे’

नवी दिल्ली, ता. १५ (पीटीआय) : ड्रोन आणि मानवरहित विमान यंत्रणा (यूएएस) ही हवाई शक्तीचा विस्तार असून, ती आता केवळ आकाशातील डोळे राहिलेली नाहीत, तर ती आकाशातील ‘तीक्ष्ण नखे असलेले पंजे’ बनले आहेत, असे प्रतिपादन हवाई दल प्रमुख हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी शुक्रवारी केले.

‘मानवरहित विमान यंत्रणा आणि त्याविरोधी उपाययोजना’ या विषयावरील संरक्षण चर्चासत्रात ते बोलत होते. आधुनिक हवाई धोक्यांचा सामना करताना संपूर्ण क्षेत्राची माहिती असणे ही गुरुकिल्ली असून, एकाच हवाई क्षेत्रात कार्यरत असलेल्या तिन्ही दलांमध्ये ‘पूर्ण समन्वय’ असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम आशियातील संघर्षाचा संदर्भ देत हवाईदल प्रमुख म्हणाले, की जर आपल्याला आपल्या आणि शत्रूच्या स्थानांची अचूक माहिती नसेल, तर कुवेतमध्ये एफ-१५ विमानांच्या बाबतीत घडली तशी स्वतःच्याच दलांकडून झालेला हल्ल्यातील नुकसानासारखी घटना घडू शकते. अशी चूक आपल्याला परवडणारी नाही. ड्रोन हे आजचे वास्तव असून ते भविष्यातील तंत्रज्ञान राहिलेले नाही. रणांगणाचे स्वरूप बदलले असून आपण आता केंद्रित हवाई शक्तीकडून विकेंद्रित आणि स्वायत्त पद्धतीकडे वळत आहोत, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी मेमध्ये झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत हवाईदलप्रमुख म्हणाले की, हवाई दलाच्या एकात्मिक नियंत्रण प्रणालीमुळे (आयएसीसीएस) शत्रूचे एकही अस्त्र किंवा ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाही. शत्रूने पाठवलेले ड्रोनचे थवे भारतीय दलांनी निष्प्रभ केले. संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची किंमत पाहण्यापेक्षा, ज्या लक्ष्याचा बचाव करायचा आहे त्याचे मूल्य महत्त्वाचे असते. भविष्यात मानवी आणि मानवरहित यंत्रणांचा एकत्रित वापर (मॅन्ड अँड अनमॅन्ड टीमिंग) महत्त्वाचा ठरेल. मानवाला या प्रक्रियेतून पूर्णपणे बाजूला काढता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com