प्राध्यापकांना अपडेट करतेय ‘यूजीसी’चे केंद्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

‘यूजीसी’ने प्राध्यापकांना अद्ययावत व विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. यंदा खास प्राचार्यांसाठीही प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
- डॉ. संजीव सोनवणे, संचालक, मानव संसाधन विकास केंद्र, पुणे 

पुणे - नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापकांमध्ये शिकविण्याची कौशल्ये कमी असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू केलेल्या मानव संसाधन विकास केंद्रातून दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील प्राध्यापक प्रशिक्षण घेऊन अपडेट होत आहेत. एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत सुमारे ६ हजार प्राध्यापकांनी या केंद्रातून शिकविण्याची नवी तंत्रे आणि कौशल्ये आत्मसात केली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारकडून पुण्यात प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी नवीन केंद्र उभारले जाणार जात असून, राज्यातील ५५ हजार प्राध्यापकांना त्याचा फायदा होईल. ‘यूजीसी’ने मात्र आधीच ही गरज ओळखून १९९० मध्ये पुण्यासह देशभरात ६६ ठिकाणी मानव संसाधन विकास केंद्रे (एचआरडीसी) सुरू केली. या केंद्रांत नव्याने नोकरीत येणाऱ्या प्राध्यापकांसाठी २८ दिवसांचा ‘ओरिएंटेशन प्रोग्रॅम’; तर अनुभवी प्राध्यापकांसाठी २१ दिवसांच्या ‘रिफ्रेशर कोर्स’सह इतर अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. ‘ओरिएंटेशन प्रोग्रॅम’मध्ये शिकविण्याच्या पद्धतीसह विद्यार्थ्यांशी वर्तन कसे असावे, प्रश्‍न कसे तयार करावेत, उत्तरे कशी द्यावीत, व्यक्तिमत्त्व विकास, विद्यापीठ कायद्यातील तरतुदी आणि इतर माहिती २८ दिवसांच्या वर्गातून दिली जाते. ‘रिफ्रेशनर कोर्स’ हे अनुभवी प्राध्यापकांना त्यांच्या बढतीसाठी अनिवार्य असून, शिवाय बदलत्या काळानुरूप अध्यापनातील नवीन गोष्टीही शिकविल्या जातात. 

‘पुण्यात प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेले तज्ज्ञ, सुविधा, शिकविण्याची पद्धत यामुळे देशाच्या इतर भागातील प्राध्यापक प्रशिक्षणासाठी पुण्याची निवड करतात. येथील प्रशिक्षणाचा फायदा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना होतो,’’ असे केंद्राचे समन्वयक सचिन सुर्वे यांनी सांगितले. 

मुंबई, चंडीगड, अलिगड, उस्मानिया या विद्यापीठांमध्ये मी प्रशिक्षण घेतले होते; परंतु त्यातुलनेत पुणे विद्यापीठाच्या केंद्रातील शिकविण्याची पद्धत वेगळी आहे. या प्रशिक्षणामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवतानाचा दृष्टिकोन बदलून जातो. 
- डॉ. आस्मा खान, प्राध्यापक, सोशल आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Updating Professors at UGC Center