“उपळाई बुद्रुक निवडणूक: एकाच गावातील उमेदवारांमुळे स्थानिक प्रतिष्ठेची लढाई” (भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढतीकडे तालुक्याचे लक्ष)
लोगो : उपळाई बुद्रूक जि.प. गट
---
एकाच गावातील उमेदवारांमुळे स्थानिक प्रतिष्ठेची लढाई
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढतीकडे तालुक्याचे लक्ष; राजकीय हालचालींना वेग
अक्षय गुंड : सकाळ वृत्तसेवा
उपळाई बुद्रूक, ता. ३ : उपळाई बुद्रूक जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोचला असून, होम टू होम प्रचारासह जाहीर सभा आणि प्रत्युत्तर सभांमुळे संपूर्ण गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर एकाच गावातील उमेदवार आमने- सामने असल्याने निवडणूक केवळ पक्षीय न राहता स्थानिक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीकडून हर्षदा नीलेश पाटील तर भाजपकडून माधुरी मुन्नाराजे मोरे या दोन्ही उमेदवार बावी गावातील असल्याने गावोगावी प्रचारात तीव्रता दिसून येत आहे. उपळाई बुद्रूक पंचायत समिती गणातही अशीच परिस्थिती असून, मतदारांचा कौल कोणत्या बाजूने झुकणार, याबाबत संभ्रम कायम आहे. प्रचारादरम्यान वैयक्तिक समीकरणे, जुने वाद आणि स्थानिक गटबाजी उघडपणे समोर येत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जाहीर सभेमुळे भाजपच्या प्रचाराला बळ मिळाले असले, तरी त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून खासदार धैर्यशील मोहिते- पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेल्या प्रत्युत्तर सभांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. दोन्ही बाजूंनी आरोप- प्रत्यारोप सुरू असून, निवडणूक प्रचार आक्रमक व निर्णायक वळणावर आला आहे.
या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पत्नींच्या प्रचारासाठी पतींनी उभारलेली स्वतंत्र प्रचार यंत्रणा. यामुळे प्रचार अधिक संघटित आणि प्रभावी झालेला दिसतो. त्याचवेळी उपळाई गटात घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे कुलकर्णी गटात फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या मंचावर दिसलेले प्रकाश कुलकर्णी आणि राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रिय असलेल्या ज्योती कुलकर्णी यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उपळाई पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे दीपक देशमुख आणि भाजपचे प्रा. नितीन झाडबुके यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही उमेदवार उपळाई बुद्रूक गावातीलच असल्याने येथील निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरण्याची चिन्हे आहेत. भुताष्टे पंचायत समिती गणात मात्र अर्ज माघारीच्या दिवशी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी उमेदवारी मागे घेत अपक्ष उमेदवार स्वाती हनुमंत गिड्डे यांना भाजपकडून पुरस्कृत केल्याने येथे लढतीचे स्वरूप पूर्णतः बदलले आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे डॉ. संतोष दळवी असल्याने हा गण सत्तासंघर्षाचे केंद्र बनला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर उपळाई बुद्रूक जिल्हा परिषद गटात प्रभावी असलेल्या साठे गटाचा भाजप उमेदवारांना मिळालेला जाहीर पाठिंबा हा निवडणुकीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांच्या भूमिकेमुळे गटातील राजकीय समीकरणे बदलली असून, भाजपचे पारडे जड झाल्याची चर्चा सुरू आहे.
लोकसभा आणि विधानसभेत झालेल्या राजकीय परिवर्तनाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत होणार, की स्थानिक गटबाजी आणि प्रभावी नेत्यांचे पाठबळ निर्णायक ठरणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याच्या घडीला उपळाई बुद्रूक गटातील निवडणूक संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी, अत्यंत चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे.
---
चौकट
भाजपसाठी जमेची बाजू
- साठे गटाचा पाठिंबा.
- पालकमंत्र्यांची प्रभावी जाहीर सभा
- नाराज मानले जाणारे शंभूराजे मोरे व त्यांच्या पत्नीचा सक्रिय प्रचार
- सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा मुद्दा
- आमदार अभिजित पाटील यांच्या अपूर्ण आश्वासनांवर टीका करण्याची संधी
---
राष्ट्रवादीकडून जमेची बाजी
- खासदार-आमदारांची सलग शक्तिप्रदर्शनासह सभा
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची सहानुभूती
- लोकसभा-विधानसभेनंतर जि.प. व पं.स.मध्ये परिवर्तनाचा जोरदार
नारा
- ३० वर्षांच्या सत्तेवर विकास न केल्याचा थेट आरोप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

