

पान ८ साठी
स्वस्त होतोय युरिया, फॉस्फेट मात्र उंचावरच
-------------
एएमआयएस मार्केट मॉनिटरमधील निरीक्षण; गंधक टंचाईने फॉस्फेट उत्पादनावर परिणाम
-------------
रोम ः जागतिक बाजारात नत्रयुक्त खतांचे दर ऑगस्टमध्ये कमी झाले, मात्र फॉस्फेट खतांचे दर उंच पातळीवरच राहिले. भारताच्या मोठ्या युरिया निविदेमुळे पुरवठ्याची स्थिती सुधारली असताना, गंधकाच्या टंचाईमुळे फॉस्फेट उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. अॅग्रिकल्चरल मार्केट इन्फर्मेशन सिस्टीम (एएमआयएस)च्या ताज्या मार्केट मॉनिटरमध्ये ही स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
भारताने ११ ऑगस्ट रोजी काढलेल्या १७ लाख टन युरिया निविदेतील दर जूनमधील निविदेच्या तुलनेत प्रति टन ५५ डॉलरने कमी होते. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी युरियाचा पुरवठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. चीनने निर्यात कोटा वाढविल्याने तसेच रशिया, नायजेरिया आणि उत्तर आफ्रिकेतून अतिरिक्त पुरवठा झाल्याने जागतिक बाजारातील उपलब्धता वाढली. भारताबाहेरील मागणी मात्र तुलनेने मंद आहे. ब्राझीलकडून पुन्हा खरेदी सुरू होण्याची अपेक्षा आहे.
फॉस्फेटच्या बाजारात मात्र पुरवठ्याची स्थिती तंग आहे. गंधकाची उपलब्धता कमी झाल्याने फॉस्फेट खतांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून मोरोक्कोला त्याचा विशेष फटका बसला आहे. सौदी अरेबियाची निर्यातही मर्यादित राहिली. चीनच्या फॉस्फेट निर्यातीवरील निर्बंधांचा जाहीर कालावधी संपत आला असला, तरी चिनी पुरवठा पुन्हा सुरू होण्याचे संकेत अद्याप नाहीत. फॉस्फेटचे दर जास्त असल्याने मागणी काहीशी मंदावली आहे. मात्र हंगामी मागणी सुरू झाल्यानंतर दरांना आधार मिळण्याची शक्यता आहे.
ऑगस्टमधील सरासरी दरांनुसार युरियाचा दर प्रति टन नत्रामागे ९२२.४ डॉलर होता. ऑगस्टमध्ये तो ४.३ टक्क्यांनी आणि वर्षभरात १३.६ टक्क्यांनी कमी झाला. फॉस्फेटचा दर प्रति टन पी₂ओ₅मागे १,८५९.८ डॉलर होता. महिन्याभरात त्यात केवळ ०.५ टक्के घट झाली; मात्र वर्षभरात तो ९.३ टक्क्यांनी वाढला. अमोनियाचा दर प्रति टन ६६८.१ डॉलर असून वर्षभरात त्यात २६.८ टक्के वाढ झाली आहे.
पोटॅशचे दर गेल्या काही महिन्यांत जवळपास स्थिर राहिले आहेत. कॅनडा, बेलारूस आणि रशियात २०२७ मध्ये नवी उत्पादन क्षमता सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील काळात पोटॅशचे दर स्थिर ते काहीसे नरम राहण्याचा अंदाज एएमआयएसने व्यक्त केला आहे.
धोरणांच्या पातळीवरही भारत आणि रशियातील घडामोडी महत्त्वाच्या आहेत. भारताच्या आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने १५ जुलै रोजी युरियासाठी नवे राष्ट्रीय गुंतवणूक धोरण मंजूर केले. देशांतर्गत गॅसआधारित युरिया उत्पादनातील गुंतवणूक वाढविणे हा या धोरणाचा उद्देश आहे. दरम्यान, रशियाने गंधकावरील निर्यातबंदीचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे फॉस्फेट खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.