एमबीबीएम कंपनीकडून नियमांचे उल्लंघन

एमबीबीएम कंपनीकडून नियमांचे उल्लंघन
Published on

पिरंगुट, ता. ८ : उरवडे (ता. मुळशी) येथील एमबीबीएम कंपनीकडून होणारे ध्वनी व वायू प्रदूषण आणि सुरू असलेल्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या कंपनीमुळे लगतच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उरवडे येथील लवासा रस्त्यालगत असलेल्या ‘मुलर-बीबीएम अकौस्टिक टेक्नॉलॉजी’ या कंपनीकडून सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीसीबी) कंपनीला ‘स्थापना संमती पत्र’ देताना घातलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक, लहान मुले आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, काहींना श्‍वसनाचे व कानाचे आजार जडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर मारणे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नियमानुसार ‘रेड कॅटेगरी’मधील कंपनी शाळा, रुग्णालय आणि रहिवासी क्षेत्रापासून किमान १०० ते २०० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र, या कंपनीने नियमांचे उल्लंघन करून काम सुरू ठेवले आहे. कंपनीने ‘सेकंड कन्सेन्ट’ न घेताच मॅन्युफॅक्चरिंग आणि वेल्डिंगची कामे सुरू केली असून, ही प्रशासनाची फसवणूक आहे. पीएमआरडीए प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन स्थळपाहणी करावी आणि कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी,

या प्रकरणाबाबत कंपनीचे मानवसंसाधन अधिकारी लक्ष्मण कारभारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासकीय स्तरावर काय पावले उचलली जातात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com