

वॉशिंग्टन, ता. १८ (पीटीआय) : अमेरिकेतील नोकरीवर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या नियमांत ट्रम्प प्रशासनाने मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. परदेशी कामगारांऐवजी अमेरिकी नागरिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बदलांमध्ये फिजिओ थेरपिस्ट, परिचारिकांपासून ते उच्चकौशल्य असलेल्या व्यावसायिकांपर्यंतच्या सर्व नोकऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.
अमेरिकेच्या कामगार विभागाने आज ‘प्रोग्रॅम इलेक्ट्रॉनिक रिव्ह्यू मॅनेजमेंट’ (पर्म) या इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेतील नवीन नियम प्रस्तावित केले. मागील २० वर्षांतील ही पहिलीच मोठी सुधारणा मानली जात आहे. नवीन प्रस्तावानुसार, रोजगार देणाऱ्या कंपन्यांना (नियोक्त्यांना) परदेशी कामगारांच्या सोयीनुसार नोकरीच्या अटी किंवा निकष बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रस्तावित नियमांनुसार, नियोक्त्यांना नोकरीची जाहिरात देताना अमेरिकी आणि परदेशी अशा दोन्ही कामगारांसाठी समान मार्ग आणि पद्धतींचा अवलंब करावा लागेल. आता पारंपारिक मुद्रित जाहिरातींऐवजी नियोक्त्यांची संकेतस्थळे, जॉब पोर्टल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जॉब फेअर आणि कॅम्पस रिक्रूटमेंट यांसारख्या ऑनलाइन माध्यमांतून भरती करणे बंधनकारक ठरणार आहे. तसेच, रिक्त पदांच्या जाहिरातीचा किमान कालावधी ३० दिवसांवरून वाढवून ९० दिवस करण्यात आला आहे. पात्र अमेरिकी कामगारांच्या भरतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे नियोक्त्यांना सिद्ध करावे लागेल.
या प्रस्तावित बदलांमुळे उच्च कौशल्य आणि जास्त वेतनाच्या नोकऱ्यांसाठी अमेरिकी कामगार पहिल्या रांगेत असतील, असे कामगार सचिव किथ सोंडरलिन्ग यांनी सांगितले. विभागाने काही विशिष्ट व्यवसायांसाठी असलेली प्रशासकीय सवलतही रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सुधारित आराखड्यामुळे फिझिकल थेरपिस्ट, परिचारिका आणि विज्ञान किंवा कला क्षेत्रात अपवादात्मक क्षमता असलेल्या पदांसाठी नियोक्त्यांना प्रथम पात्र अमेरिकी अर्जदारांचा विचार करावा लागेल.
कपात झालेल्या कामगारांना संरक्षण
ज्या अमेरिकी कामगारांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे, त्यांच्या संरक्षणासाठीही कडक तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ज्या नियोक्त्यांनी मागील दोन वर्षांत अमेरिकी कामगारांना कामावरून कमी केले आहे, त्यांना त्याच किंवा तत्सम पदांसाठी कायमस्वरूपी कामगार प्रमाणन मिळवण्यापासून रोखले जाईल. अमेरिकी नियोक्त्यांसाठी परदेशी नागरिकांना कायमस्वरूपी वास्तव्यासाठी (ग्रीन कार्ड) प्रायोजित करण्याची ‘पर्म’ ही पहिली पायरी आहे. सध्याच्या नियमांनुसार, नियोक्त्याला देशांतर्गत बाजारात कोणताही पात्र अमेरिकी कामगार उपलब्ध नाही, हे सिद्ध करावे लागते. आता हे नियम अधिक कडक होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.