नदी शुद्धीकरणाच्या संकल्पनेला अमेरिकेचे 'पेटंट'

नदी शुद्धीकरणाच्या संकल्पनेला अमेरिकेचे 'पेटंट'

पुणे - नदीपात्राजवळून फिरताना नकळतच आपले हात नाकाला लागतात. मुळा-मुठेतील मैला आणि त्याची दुर्गंधी हा पुणेकर आणि महापालिकेसाठीही नेहमीच ‘स्वच्छते’चा विषय राहिला आहे. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ करण्यासाठी नदीशुद्धीकरण अनिवार्य आहे. याचाच विचार करत राजेंद्र लडकत यांनी नदी पुनरुज्जीवनासाठी नामी शक्कल लढवली आहे आणि त्यासाठी अमेरिकेचा बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) प्राप्त केला आहे.

नदीच्या पाण्यातील मैला, प्लॅस्टिक, घनकचरा आणि जलपर्णी यांचे विलगीकरण करण्यासाठी पर्यावरणपूरक भिंतीची संरचना लडकत यांनी विकसित केली आहे. दोन ते तीन फूट उंच असलेल्या भिंती बारीक दगड आणि विषारी द्रव्ये शोषणाऱ्या वनस्पतींपासून बनवलेल्या असतील. नदीपात्राच्या दोन्ही बाजूस तिरक्‍या पद्धतीने त्यांची बांधणी केली असेल. यामुळे पाण्याची घुसळण वाढेल आणि जास्त प्रमाणात ऑक्‍सिजन पाण्यात मिसळेल. दर शंभर मीटरला गाळ काढण्यासाठी स्वतंत्र रचना असेल, तसेच अर्धगोलाकार जाळीमुळे प्लॅस्टिकसारखा घनकचरा विलग करणे शक्‍य होणार आहे.

लडकत म्हणाले, ‘‘नदीतील जलपर्णी, डास यांमुळे नागरिक त्रस्त होतात आणि त्याचा आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. जलपर्णी आणि गाळ काढण्यासाठी महापालिकेला करोडो रुपये खर्च होतात. आमच्या या संकल्पनेने कमी खर्चात पर्यावरणपूरक नदी शुद्धीकरण प्रकल्प उभा राहील.’’ 

संबंधित प्रकल्प पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केले असता त्यांनी ‘स्तुतिजन्य’ असा शेरा दिला आहे. तसेच राज्य पातळीवर ही संकल्पना राबविण्याचा आदेश दिला आहे.

आम्ही वैकुंठाजवळील नाल्यात अथवा नदीत संकल्पना राबविण्यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. पालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अभिप्रायासाठी संकल्पना पाठविली आहे. लवकरच आम्ही प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण करू.
- राजेंद्र लडकत

 

संकल्पनेची वैशिष्ट्ये
भिंतीत वापरल्या जाणाऱ्या ‘व्हिटीपर ग्रास’ या वनस्पतीमुळे विषारी द्रव्ये शोषण्यास मदत
सरकणाऱ्या अर्धगोलाकार जाळीमुळे महिन्याला घनकचरा काढणे सोपे
भिंतीसाठी पेिव्हंग ब्लॉकचा वापर करण्यात आल्यामुळे पाणी पाझरण्याची प्रक्रिया चालू राहील
पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी पाण्याच्या दाबावर फिरणाऱ्या जलचक्‍क्‍यांचा वापर
१०० मीटरसाठी ५० लाख खर्च अपेक्षित
पर्यावरणपूरक पद्धतीमुळे नदीपात्राचे सौंदर्य वाढविणे शक्‍य

संकल्पनेचे फायदे
  जलपर्णी आणि डासांचा प्रादुर्भाव कमी
  मैलापाणी स्वच्छतेचा खर्च कमी, दुर्गंधी कमी
  देखभाल आणि मनुष्यबळावर खर्च वाचणार
  सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न कमी करण्यास मदत
  विजेचा वापर नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com