esakal | ऑक्सिजनचा न्याय्य वापर करा; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

बोलून बातमी शोधा

Use oxygen fairly The advice of a medical expert
ऑक्सिजनचा न्याय्य वापर करा; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
sakal_logo
By
टीम सकाळ

पुणे : ''ऑक्सिजनच्या तुटवड्याबरोबरच त्याच्या न्याय्य वापराकडे प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे. रुग्णाला आवश्यक ऑक्सिजनची गरज शक्य तितक्या लवकर कमी करण्यावर भर देण्याची गरज आहे,'' असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी बुधवारी व्यक्त केले. शहरात कोरोनाचा प्रचंड उद्रेक सुरू आहे. कोरोनाबाधीतांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून ऑक्सिजनवर ठेवावे लागते. याचा थेट परिणाम रुग्णालयातील वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढली. या पार्श्वभूमिवर शक्य तितक्या लवकर रुग्णाची ऑक्सिजनची आवश्यकता कमी होईल, या दृष्टीने उपचाराचे नियोजन केले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

रूबी हॉल क्लिनिकचे डॉ. कपिल झिरपे म्हणाले, ‘‘रुग्णाला लागणारा ऑक्सिजन कमी कसा होईल, यावर लक्ष दिले जाते. ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळित झाल्याने त्याचा वापर न्याय्यपणे करणे गरजेचे असते. ती वेळ आता पुण्यात आली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसेल तर आपली मागणी कमी कशी होईल आणि मिळालेल्या ऑक्सिजनमध्ये आपण सगळ्या रुग्णांना तो व्यवस्थित कसा देऊ शकतो, यावर भर देण्याची गरज आहे.’’

लवकर निदान करा

रुग्णाला स्पष्ट लक्षणे दिसत असली तरीही बहुतांशवेळा प्रयोगशाळा तपासणी करत नाहीत. उशिरा रोगनिदान झाल्याने रुग्णाची ऑक्सिजनची गरज वाढते. त्यामुळे रुग्ण लवकर व्हेंटिलेटर जातो, असे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

ऑक्सिजन बेडची गरज

कोरोनाबाधितांची ऑक्सिजनची मागणी खूप जास्त असते. त्यांना उपचारांसाठी व्हेंटिलेटर ठेवले जाते. अत्यवस्थ रुग्णांनाच व्हेंटिलेटर सपोर्ट देण्याची गरज लागते. सध्या व्हेंटीलेटरवर जाणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. दोन ते पंधरा लिटर प्रतिमिनीट वेगाने ऑक्सिजन द्यावा लागतो.

ऑक्सिजन बेडचे प्रकार....

१) इंवेसिव्ह व्हेंटिलेटर : यात तोंडातून नळी टाकून रुग्णाला ऑक्सिजन दिला जातो.

२) नॉन इंवेसिव्ह व्हेंटिलेटर : यात तोंडातून नळी न टाकता रुग्णाला मास्क लावून त्या माध्यमातून व्हेंटिलेटर केले जाते.

व्हेंटीलेटरवर रुग्णाला उपचार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नितांत आवश्यकता असते. तसेच, तेथील पॅरामेडिकल स्टाफही प्रशिक्षित असावा लागतो.

पॉझिटिव्ह म्हणजे ॲडमिट असे नाही

कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, म्हणजे त्याला ॲडमिट केलेच पाहिजे, असे नाही. रुग्णाचे वय, त्याला असलेले इतर आजार, कोरोनाची लक्षणे, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, त्याला होणारा नेमका त्रास या सर्वांचा विचार करून रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्याची गरज आहे की नाही?, याचा निर्णय डॉक्टर घेतात. त्यामुळे कोरोनाचे निदान झाल्यानंतर सर्वांनाच रुग्णालयात दाखल होण्याची निश्चितच गरज नसते.

जवळच्या रुग्णालयात जा !

पुण्यातील बहुतांश रुग्णालयांमधील खाटा कोरोनाबाधीत रुग्णांनी भरल्या आहे. अशा वेळी ऑक्सिजन कमी होणाऱ्या रुग्णांनी विशिष्ट एका रुग्णालयातच दाखल होण्याचा हट्ट सोडून जवळच्या आणि मिळेल त्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे. उपचारांसाठी वेळ वाया घालवू नका. त्यामुळे रुग्णांवर वॉर्डमध्येच उपचार होतील. तो अतिदक्षता विभागात (आयसीयू) येणार नाही, याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे, असे डॉ. झिरपे यांनी स्पष्ट केले.

‘वॉक टेस्ट’ फक्त होम आयसोलेशनसाठी

रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण किती कमी होत आहे, ते बघण्यासाठी सहा मिनिटांचे ‘वॉक टेस्ट’ आहे. चालण्यापूर्वी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजायचे आणि सहा मिनीट चालल्यानंतर पुन्हा ऑक्सिजन किती आहे, हे पहायचे. त्यावरून ऑक्सिजनचे प्रमाण कळते. पण, ही चाचणी फक्त घरात अलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी आहे.