मनाचिये वारी : विठ्ठलाचे अखंड चिंतन हीच यंदाची वारी

utpat.jpg
utpat.jpg

Wari 2020 : पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्र अशा चार वारी भरतात. आषाढी वारी सर्वांत मोठी असते. नामदेव महाराजांनी पांडुरंगाच्या आरतीमध्ये म्हटले आहे की,
आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती।।

म्हणजे आषाढी वारीने मुक्ती प्राप्त होते. आषाढात मृगाचा पाऊस पडतो. शेतकरी पेरण्या उरकून वारीत सहभागी होतात. ही वारी अनादी कालापासून अखंडपणे सुरू आहे. कारण संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे आईवडीलही वारी करीत होते. मात्र, ज्ञानेश्‍वर महाराज आणि समकालीन संतांनी या वारीचे स्वरूप वाढविले. त्यामुळेच आज आषाढी एकादशीला दहा ते बारा लाख वारकरी पंढरीत येतात. पंढरीत आल्यानंतर वारकऱ्यांचे नित्यनेम आहेत. चंद्रभागा स्नान, पुंडलिकाचे दर्शन, नामदेव पायरी, चोखा मेळा समाधी दर्शन, विठ्ठल दर्शन आणि पंढरपूर नगरप्रदक्षिणा हा नित्यनेम वारकरी अखंडपणे जपतात. "जय जय राम कृष्ण हरी' हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र अगदी सोपा आहे. वारीच्या काळात वारकरी आत्मिक समाधानाची अनुभूती घेतात. त्यामुळे त्यांना कधी एकदा वारी येते, असे होऊन जाते.

यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. कोरोनाने अवघ्या विश्‍वाला हैराण केले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने पायी आषाढी वारी रद्द केली. पायी वारी रद्द होण्याची इतिहासात पहिलीच वेळ आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने त्याला इलाज नाही. यापूर्वी प्लेग, इन्फ्लूएन्झा, कॉलरा या सारख्या साथीच्या काळात तसेच महापुरामध्येही वारी झाली. मात्र, कोरोनाची साथ भयंकर असल्याने सामाजिक भान राखून वारकरी संप्रदायाने संयम दाखवत सरकारचा निर्णय स्वीकारला. वारीला जायला मिळाले नाही, असे चिंतत बसण्यापेक्षा घरात बसून विठ्ठलाचे अखंड चिंतन करावे.

वारीतील नित्यक्रम करावा. काकडा, हरिपाठ, ग्रंथवाचन करावे. विठ्ठलाचे अखंड चिंतन हीच त्याची खरी वारी आहे. तसेच वारकऱ्यांनी संत सावतामाळी यांचे जीवन समोर ठेवावे. पंढरपूरपासून अवघ्या तीस किलोमीटरवर सावतामाळी यांचे अरण हे गाव आहे. मात्र, ते कधीही वारीला पंढरपूरला आले नाहीत. त्यांनी आपल्या शेतातील कामच विठ्ठलस्वरूप मानले. त्यांच्या अखंड स्मरणाने विठ्ठलाला त्यांच्याकडे जावे लागले. त्यामुळे वारकऱ्यांनी श्रद्धा भावाने विठ्ठलभक्ती करून वारीचा काळ घरीच घालवावा. जो निष्ठापूर्वक त्याला स्मरेल, त्याच्या स्वप्नात येऊन विठुराया दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही.
(शब्दांकन : शंकर टेमघरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com