बारामती तालुक्यातील 1278 शासकीय व 2200 खाजगी वैद्यकीय कर्मचा-यांनी कोविड अँपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. दरदिवशी किमान तीनशे लोकांना लस देण्याचा प्रयत्न असून दहा दिवसात लसीकरण संपविण्याचे उद्दीष्ट आहे.
बारामती : कोरोनायोध्दे म्हणून गेले अकरा महिने सातत्याने काम करणाऱ्या बारामती तालुक्यातील शासकीय व खाजगी क्षेत्रातील 3500 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. शनिवारपासून (ता. 16) लसीकरणास प्रारंभ होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती तालुक्यातील 1278 शासकीय व 2200 खाजगी वैद्यकीय कर्मचा-यांनी कोविड अँपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. दरदिवशी किमान तीनशे लोकांना लस देण्याचा प्रयत्न असून दहा दिवसात लसीकरण संपविण्याचे उद्दीष्ट आहे.
दुसऱ्या टप्प्यात पोलिसांसह होमगार्ड, नगरपालिकेचे कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना लस दिली जाईल. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह मधुमेह, रक्तदाब व इतर व्याधी असलेल्या रुग्णांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केल्यानंतर कर्मचाऱ्यांना निरिक्षणाखाली ठेवले जाणार असून काही त्रास झाल्यास प्राथमिक उपचाराचीही तयारी करण्यात आली आहे.
असे होणार लसीकरण
• पाच जणांचे पथक लसीकरण करणार
• एक प्रत्यक्ष लस देणारा व इतर चार सहकारी असणार
• रुई ग्रामीण, महिला रुग्णालय व सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणहोणार
• स्वतंत्र लसीकरण कक्ष उभारला जाणार
• लस घेण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची तपासणी होणार
• प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष असणार