esakal | पुण्यात लसीकरणाचा महागोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

पुण्यात लसीकरणाचा महागोंधळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पाच दिवसांनंतर ४५ ते पुढील वयोगटासाठी शहरात लसीकरण (Vaccination) सुरू झाले. सकाळी सात वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा लागण्यास सुरुवात झाली. पण, १० वाजत आले तरी अनेक केंद्रांवर (Covid Vaccine Center) लस उपलब्ध झाली नाही. लसीकरण सुरू झाले तरी रांगेत थांबलेल्या नागरिकांऐवजी (Public) वशिल्याने आलेल्यांचा नंबर आधी लागला. तसेच, १८ ते ४४ वयोगटासाठी तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे (Covaccine) ५०० डोस उपलब्ध करून दिले होते, यातीलच डोस ४५ ते पुढील वयोगटाला दुसऱ्या डोससाठी वापरल्याने या केंद्रांवर चांगलाच गोंधळ झाला. (Vaccination Issue in Pune)

शहरात १ मे पासून ४५ ते पुढील वयोगटासाठी लसीकरण बंद होते. नागरिकांना दुसरा डोस घेणे गरजेचे असताना लस उपलब्ध न झाल्याने वाट पहावी लागत होती. सरकारकडून मंगळवारी लस उपलब्ध झाल्यानंतर बुधवारी ९७ केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि १८ केंद्रांवर कोव्हॅक्सिन देण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले होते. सोशल मीडियावरून कोणत्या केंद्रावर, कोणती लस मिळणार हे जाहीर केले होते. पण ज्येष्ठांना याबद्दल काहीच माहिती नव्हते, त्यामुळे त्यांचे हाल झाले.

हेही वाचा: पुण्यातील रुग्णांना दिलासा; जिल्ह्याला मिळणार १२ हजारांहून अधिक रेमडिसिव्हीर

धायरीतील लायगुडे रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटासाठी कोव्हॅक्सिनचे ५०० डोस पुरविण्यात आले, पण ४५ ते पुढील नागरिकांसाठी स्वतंत्र कोटा न देता याच यामधूनच त्यांनाही दुसरा डोस देण्यात आला. तेथे रजिस्टरमध्ये नावे नोंदवून घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी बोलविले जात होते. पण ज्या तरुणांनी आॅनलाइन नोंदणी केली होती, त्यांना स्लॉटप्रमाणे लस मिळालीच नाही. अनेक नागरिक सकाळी ९-१० वाजता रांगेत थांबले होते. त्यांना दुपारी चार वाजताही लस मिळाली नाही. भर उन्हात उपाशीतापाशी हे नागरिक थांबल्याने त्यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

कोव्हिशिल्ड लशीचे २३ हजार डोस उपलब्ध असले तरी ९७ केंद्रांवर काही ठिकाणी १०० तर काही ठिकाणी ८० डोसचा पुरवठा केला. दुसऱ्या डोससाठी केंद्रांवर २०० ते ३०० नागरिक रांगेत उभे होते. फक्त ८० डोस असल्याने नागरिकांनी तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पण त्यांना समजावून सांगून पुन्हा यावे असे सांगितले.

महापालिकेने रात्री उशिरा नियोजन जाहीर केल्याचाही फटका नागरिकांना बसला. कोव्हॅक्सिन कोणत्या केंद्रांवर व कोव्हिशिल्ड कोणत्या केंद्रांवर मिळणार, हे माहिती नव्हते. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर चौकशीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण मोठे होते. अनेकांना हेलपाटे मारावे लागले.

हेही वाचा: पुण्याचा गडी लढवतोय टोकियोची विधानसभा; नगरसेवक पदावरुन आमदारकीकडे झेप

दोन्ही गटांसाठी स्वतंत्र केंद्र हवे

१८ ते ४४ वयोगटासाठी आॅनलाइन बुकिंग आहे, तर ४५ ते पुढील वयोगटासाठी थेट केंद्रावर येऊन लस घेता येते. पण महापालिकेने या दोन्ही गटांची स्वतंत्र व्यवस्था न करता एकाच ठिकाणी लस दिली आहे. त्यामुळे आॅनलाइन बुकिंग केलेल्या तरुणांना प्राधान्य द्यायचे की ज्येष्ठांना, असा गोंधळ उडाला.

लसीकरण केंद्रे वाढविली पाहिजेत. सकाळी ११ ते १२ चा स्लॉट देऊनही दोन वाजता लस मिळाली. एक तास रांगेमध्ये थांबलो. त्यामुळे गोंधळ होत आहे. गर्दीमुळे कोरोना होईल का, अशी भीती वाटत आहे. १० मिनिटांच्या कामाला तीन तास लागत आहेत. स्लॉट बुक करूनही लस मिळत नाही.

- अनिकेत राठी, हडपसर

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा