पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम; पाच वर्षांपासून कोरड्या विहिरीला लागला पाझर

पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम; पाच वर्षांपासून कोरड्या विहिरीला लागला पाझर
Published on

SGW26B09661, SGW26B09660
वाढेगाव (ता. सांगोला) : येथील विहिरीशेजारी प्रकल्पासाठी परिश्रम करताना नागरिक. (दुसऱ्या छायाचित्रात) प्रकल्प राबविल्यानंतर विहिरीत आलेले पाणी.
---
पाच वर्षांपासून कोरड्या विहिरीला फुटला पाझर!
वाढेगावात पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम; भूजल पातळीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १९ : माणगंगा भ्रमणसेवा संस्था, वाढेगाव व श्री बृहत्‌ भारत समाजसेवा संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, मेडशिंगी व वाढेगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने २०२५ मध्ये ‘जागतिक जलसंवर्धन पंधरवडा’निमित्त अप्रुका नदीवरील सिमेंट बंधाऱ्यावर राबविण्यात आलेल्या पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या प्रकल्पामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन पाच वर्षांपासून कोरडी असलेल्या विहिरीत अखंड पाण्याचा पाझर सुरू झाला आहे.
प्रकल्प स्थळापासून सुमारे २०० फूट अंतरावर असलेल्या शेतकरी दादासाहेब सोनलकर यांच्या शेतातील ८० फूट खोल व ३० फूट व्यासाची विहीर अनेक वर्षांपासून कोरडी होती. विहिरीच्या निर्मितीनंतर पाषाण दगड लागल्याने त्यात एक थेंबही पाणी साचत नव्हते. मात्र, पंचशतावरी प्रकल्प राबविल्यानंतर विहिरीत स्वच्छ पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
---
कूपनलिकांद्वारे भूजल पुनर्भरणाला चालना
या प्रकल्पांतर्गत अप्रुका नदीवरील सिमेंट बंधाऱ्याच्या पाणीसाठा क्षेत्रात बोअरिंग मशिनच्या साहाय्याने शंभर-शंभर फूट खोलीच्या पाच कूपनलिका खोदण्यात आल्या. त्यामध्ये केसिंग पाइप बसवून पाणी भूगर्भात झिरपण्यासाठी विशेष रचना करण्यात आली. पाइपभोवती खडी व दगडांचे थर देऊन पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण व मुरण क्षमता वाढविण्यात आली.
मे २०२५ मधील पावसानंतर सिमेंट बंधाऱ्यात साठलेले पाणी या कूपनलिकांमधून भूगर्भात झिरपले. त्यामुळे परिसरातील पाच ते सहा विहिरींच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकल्पामुळे परिसरातील भूजल पुनर्भरणाला चालना मिळाल्याचे दिसून येत आहे.
या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, पंढरपूरचे डॉ. आनंद भिंगे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, सुहास बाजारे आदींचे सहकार्य लाभल्याची माहिती संस्थेने दिली.
---
चौकट
आणखी दोन ठिकाणी प्रयोग
माण नदीपात्र स्वच्छ असले तरी त्यात पाणी टिकून राहण्यासाठी नदीला मिळणाऱ्या ओढ्यांतील पाणी भूगर्भात जिरविण्याचा प्रयत्न संस्थेकडून सुरू आहे. पंचशतावरी प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याने यंदा आणखी दोन सिमेंट बंधाऱ्यांवर अशाच प्रकारचे प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com