नगर रस्ता परिसरात बेकायदा फटाका स्टॉल

नगर रस्ता परिसरात बेकायदा फटाका स्टॉल
Published on: 

वडगाव शेरी, ता. २ : नगर रस्ता आणि वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये बेकायदा फटाका विक्री स्टॉलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्यावरच उभारण्यात आलेल्या या स्टॉलमुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
वडगाव शेरी, खराडी, चंदननगर, वाघोली, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी आणि धानोरी भागात बेकायदा स्टॉलची संख्या शेकडोच्या घरात आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळे अनेकांनी रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने मुख्य रस्त्यावरच मांडव टाकून विक्री सुरू केली आहे. अनेक ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही उपाय योजलेले नाहीत. असे असताना धोकादायक स्टॉलवर कारवाई करण्याऐवजी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
बेकायदा स्टॉलवर कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे दिसून आले. दुर्दैवाने अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश वालगुडे यांनी बेकायदा फटाका विक्री स्टॉलवर कारवाईचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे.

पुणे महापालिकेचे विविध विभाग कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखवतात. कारवाईचा निर्णय होईपर्यंत दिवाळी संपते. प्रशासनातील या गोंधळामुळे बेकायदा स्टॉलची संख्या वाढत असून कोणीही कोठेही स्टॉल लावत असल्याची स्थिती आहे.
- सचीन शेरे, स्थानिक रहिवासी

आम्ही फक्त नोटीस देऊ शकतो. अग्निशामक विभाग तपासणी करतो आणि आकाशचिन्ह विभाग फटाके जप्त करतो. पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध झाल्यावर आम्ही मांडवावर कारवाई करू. मात्र, दुकानांच्या फ्रंट मार्जिनमधील स्टॉलवर बांधकाम विभाग कारवाई करेल.
- करण पवळे, अतिक्रमण निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.