वडगाव शेरी - गेली दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या वडगाव शेरीतील सोमनाथ नगर भागाचा पाणी प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची आज पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी भेट घेऊन आश्वासने दिली.
मात्र आश्वासने नको, पाणी द्या… असे म्हणत पुरेसे पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका महिलांनी जाहीर केली.
येथील महिलांनी महिनाभरापूर्वी पुणे महानगरपालिकेत जाऊन पाणीपुरवठा प्रमुखांसमोर कैफियत मांडली होती. मात्र तरीही पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा झाली नाही. वडगाव शेरी भागातील सोमनाथ नगर, धनलक्ष्मी सोसायटी, ग्रेवाल सोसायटी आदी भागामधील अनेक गल्यांमध्ये पाणीटंचाई कायम आहे.
त्यामुळे पाणीटंचाईला वैतागून महिलांनी राहत्या परिसरातच सोमवारपासून (ता. २४) आंदोलनाला सुरुवात केली आहे, असे आंदोलनकर्ते राजेंद्र साळवे यांनी सांगितले. आंदोलनाची दखल घेऊन आज कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांनी स्थानिक महिलांसोबत संवाद साधला.
दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत करू, तोपर्यंत टँकर देऊ, असे आश्वासन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी महिलांना दिले. मात्र असे आश्वासन मागील दोन महिन्यांपासून मिळत असल्यामुळे आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही असे महिलांनी यावेळीअधिकाऱ्यांना सुनावले.
कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर म्हणाले, या भागात पाणीटंचाईची कारणे आम्ही शोधत आहोत. पाण्याच्या टाकीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. शिवाय या भागातील जलवाहिन्या 30 वर्ष जुन्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
संगीता ओव्हाळ (स्थानिक रहिवासी) - पाण्यासाठी दोन महिने आम्ही दारोदार फिरत आहोत. आम्हाला आश्वासन नको, पाणी द्या. आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.