वडगाव रासाईत फुले, फळझाडे, औषधी वनस्पतींच्या १० हजार वृक्षांची लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tree plantation

वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे पर्यटन स्थळाप्रमाणे तब्बल दहा एकर जागेवर फळे, फुले व औषधी वनस्पतींच्या दहा हजार झाडांची देवराई उभी राहणार आहे.

Tree Plantation : वडगाव रासाईत फुले, फळझाडे, औषधी वनस्पतींच्या १० हजार वृक्षांची लागवड

शिरूर - तालुक्याच्या पूर्व भागातील भीमानदी काठी, जेथे केवळ वेड्या बाभळी आणि काटेरी झुडपांचेच साम्राज्य होते. तेथे आता पक्ष्यांच्या खाद्यासाठी फळझाडे, औषधी वनस्पती आणि सावली देणारी गर्द झाडी बहणार आहे. शिरूरच्या वनविभागाने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच वृक्ष लागवडीने प्रारंभ झाला.

वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे पर्यटन स्थळाप्रमाणे तब्बल दहा एकर जागेवर फळे, फुले व औषधी वनस्पतींच्या दहा हजार झाडांची देवराई उभी राहणार आहे. याकामी शासकीय-निमशासकीय संस्थांबरोबरच स्वयंसेवी संस्थांनीही योगदान देणार आहेत. या प्रकल्पास रांजणगाव एमआयडीसीतील फियाट इंडिया लिमिटेड या कंपनीचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. प्रकल्पाचा सर्व खर्च फियाटने उचलला आहे, अशी माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.

प्रसिद्ध अभिनेते व सह्याद्री देवराई फाउंडेशनचे प्रमुख सयाजी शिंदे, आमदार ॲड. अशोक पवार, फियाटचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बावेजा, जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ, सरपंच सचिन शेलार तसेच पर्यावरणप्रेमी वृक्ष लागवडीप्रसंगी उपस्थित होते.

दृष्टिक्षेपात देवराई

१) सुरुवातीला चार हेक्टरवर देवराई उभी राहणार

२) देवराईच्या चोहोबाजूने बांबू व इतर संरक्षक झाडे

३) घोडनदीवरून पाइपलाइनद्वारे पाण्याची व्यवस्था

४) ‘ड्रीप इरिगेशन’द्वारे समप्रमाणात दिले जाणार पाणी

५) आत्तापर्यंत १५ लाख रुपयांचा खर्च

यांचेही योगदान

१) सह्याद्री देवराई

२) सिद्धेश्वर वनीकरण

३) वडगाव रासाईतील ग्रामस्थ

या प्रमुख झाडांची लागवड

  • आंबा

  • आवळा

  • जांभुळ,

  • चिंच

  • वड

  • पिंपळ

  • लिंबाची

  • गुलाब

  • सदाफुली

२५ लाख देवराईसाठीचा खर्च

६९ हेक्टरवर झाडे लावण्याचा निर्णय

१९२ हेक्टर वनखात्याची जागा

झाड आयुष्यभर माणसांना मदत करीत असते. झाडे आणि पक्ष्यांना सांभाळा. या दोन्हींतून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि मनुष्यजन्माची वाटचाल सुकर होईल. झाडांना सेलिब्रिटीचा दर्जा मिळायला हवा. विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाचे विचार रुजवायला हवेत.

- सयाजी शिंदे, अभिनेते

फियाट कंपनीच्या सहकार्यातून सुरवातीला चार हेक्टरवर देवराई विकसित केली जाणार असून, टप्प्याटप्प्याने इतर सामाजिक संघटना, कंपन्यांचा सीएसआर फंड यातून शंभर हेक्टरवर फळझाडे, फुलझाडे व सावली देणारी देशी झाडे फुलविली जाणार आहेत. वृक्षओळखीसाठी विद्यार्थी अभ्याससत्र पार पडावेत, असे नियोजन आहे.

- मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

पुण्यापासून हे ठिकाण जवळ असून, भीमा नदीकाठी एक सुंदर देवराई उभी राहिल्यावर पुण्याबरोबरच राज्यभरातील पर्यटकही या ठिकाणी आकर्षित होतील. त्यातून स्थानिक व्यापार आणि छोट्या धंद्यांना चालना मिळेल.

- ॲड. अशोक पवार, आमदार

पर्यावरण समतोल राखण्यासाठी फियाट कंपनीचा कायमच पुढाकार असतो. त्यातूनच कंपनीमार्फत यापूर्वी सात हजार झाडे लावली असून, आताही दहा हजार झाडे लावली जाणार आहेत. कंपनी आवारात दोन हजारांवर रोपे लावली आहेत.

- राकेश बावेजा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फियाट इंडिया लि.

बॉटनिकल गार्डन व फुलपाखरू पार्क

देवराईत एका बाजूला बॉटनिकल गार्डन केले जाणार असून, त्यात मोहगनी, सीताअशोक, बेल, बहावा, कांचन, शतावरी, हिरडा, बेहडा, आवळा या वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. गर्द सावली देणाऱ्या झाडांबरोबरच पक्ष्यांना खाद्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने पिंपरण, वड, उंबर, मोहा, ऑईन, बकुळ, रिठा ही झाडे, तर फुलपाखरे आकर्षित व्हावी, त्यांना परागकण मिळण्यासाठी फुलझाडे लावली जाणार आहेत. ती लावण्यास सुरुवातही झाली.