
विमाननगरमध्ये रस्त्यावरील मातीवरच डांबरीकरण करण्याचा प्रताप पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने केला.
मातीवर डांबरीकरणाचा 'जुगाड'; सजग महिलेमुळे निकृष्ठ काम उघड
वडगाव शेरी - विमाननगरमध्ये रस्त्यावरील मातीवरच डांबरीकरण करण्याचा प्रताप पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने केला. निकृष्ट काम सुरु असल्याचा हा प्रकार एका सजग ज्येष्ठ महिलेमुळे आज उघडकीस आला. अशा अनागोंदी कारभार विरोधात मोहल्ला समितीच्या सदस्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे.
विमाननगर भागात कैलाश सुपर मार्केट ते गणपती चौकादरम्यान बँक ऑफ बडोदा समोर पुणे महानगरपालिकेच्या पथक विभागाकडून चांगल्या रस्त्यावर गरज नसताना डांबरीकरण करण्यात आले. रस्त्यावरील कचरा माती स्वच्छ न करता, रस्त्यावर झाऱ्याने डांबर न टाकता, शिवाय रस्ता एका रेषेत सरळ व्हावा याकरता खुणा न करता पथ विभागाच्या मुकादमाच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आले.
विमाननगर सिटीजन फोरमच्या प्रमुख कनीज सुखरानी यांनी जागेवर येऊन निकृष्ट काम दाखवण्यासाठी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु एकही अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. त्यानंतर सुरू असलेल्या निकृष्ट कामाबाबत त्यांनी उपअभियंता संजय धारव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून हा प्रकार लक्षात आणून दिला.
* रस्ता केला तेथे खड्डेच नाहीत.
* रस्त्यावरील कचरा माती स्वच्छ केली नाही.
* झाऱ्याने डांबर फवारले नाही.
* रस्ता सरळ रेषेत येण्यासाठी खुणा नाहीत.
* कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याची अनुपस्थिती.
* पितळ उघडे पडल्यावर खाद्यतेलाच्या डब्याला छिद्रे पाडून डांबर फवारण्याचा 'जुगाड'
* कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावला नाही.
येथे डांबरीकरण गरजचे नसताना निकृष्ट आणि चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याची तक्रार आयुक्तांकडे करणार आहे. यामुळे रस्ता अधिक धोकादायक झाला आहे. चांगल्या सेवा नाहीत तर कर देणार नाही यासाठी मी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
- कनीज सुखराणी (विमाननगर सिटीझन फोरम)
रस्ता स्वच्छ न करता मातीवर डांबरीकरण करणे चुकीचे आहे. मी जागेवर येऊन पाहतो. कामात सुधारणा करायला सांगतो.
- पंढरीनाथ तांबारे (कनिष्ठ अभियंता, पथ विभाग)
Web Title: Vadgav Sheri Asphalting On Soil Women Propagate Their Inferiority
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..