Encroachment : अतिक्रमण विरोधी पथकावर खराडी येथे हल्ला; पाच आरोपींना अटक

पुणे महानगरपालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या अतिक्रमण विरोधी पथकावर काही अनाधिकृत भाजी विक्रेत्यांनी हल्ला करण्याची घटना खराडी येथे रोजी घडली.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

वडगाव शेरी - पुणे महानगरपालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या अतिक्रमण विरोधी पथकावर काही अनाधिकृत भाजी विक्रेत्यांनी हल्ला करण्याची घटना खराडी येथे मंगळवारी (ता 25) रोजी घडली. लाकडी दांडके व लोखंडी खोरे हातात घेऊन हल्ला करीत मारहाण करणाऱ्या पाच संशयित आरोपींना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंडे (वय-24, रा. बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. चंदन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब किसन गायसमुद्रे (वय-49), सुमित सुनील गिरी (वय 21), शेखर बाळासाहेब गायसमुद्रे (वय-21), सुनील बंडू गिरी (वय-45), गणेश बाळासाहेब गायसमुद्रे (वय-19, सर्व राहणार खराडी) यांना अटक करण्यात आली आहे.

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक भिमाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंडे आणि त्यांचे इतर दहा ते बारा सहकारी मिळून नगर रस्ता परिसरातील वडगाव शेरी विमाननगर आणि खराडी येथील पदपथावर अनधिकृतित्या बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत होते.

खराडी येथील स्वीट इंडिया चौकात अतिक्रमण विरोधी पथक दाखल झाल्यानंतर येथे पदपथावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संशयित आरोपींनी कारवाईला विरोध करीत स्वतःच्या हाताने भाजीपाला रस्त्यावर फेकला. त्यानंतर अतिक्रमण पथकावर हल्ला करीत मारहाण केली.

घटनेची माहिती पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रमुखांना आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

खराडी येथे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना आमच्या सोबत पोलीस बंदोबस्त नव्हता. तसेच महिला कर्मचारीही आमच्या सोबत नाहीत. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांकडून पुणे महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला करण्याच्या, दमदाटी करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अतिक्रमण विरोधी पथकासोबत रोज पोलीस बंदोबस्त मिळाल्यास कारवाई करणे सोपे होते.

- भिमाजी शिंदे (अतिक्रमण निरीक्षक)

अतिक्रमण पथकाच्या अधिकाऱ्यांसोबत असणाऱ्या कर्मचारी आणि पोलिसांची संख्या आयुक्तांनी वाढवावी. महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकून राहण्यासाठी हे गरजेचे आहे. पथकावर हल्ला करण्याची घटना निषेधार्थ आहे. या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला पाहिजे.

- प्रभा करपे (अध्यक्षा, रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन खराडी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.