केसनंद/ शिक्रापूर - स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे भगवे झेंडे, दिंड्या, पताकांसमवेत ठिकठिकाणाहून ज्योती घेऊन येणाऱ्या शंभूभक्तांनी केलेल्या राजांच्या जयघोषाने संपूर्ण तुळापूर परिसर दुमदुमून गेला होता.
पूजाभिषेक, शासकीय मानवंदना, शंभूराजांवर पुष्पवृष्टी, तसेच पालखीसह विविध कार्यक्रमांना दिवसभर अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने शंभूभक्तांनी तुळापुरात अभिवादनासाठी रांगा लावत मोठी गर्दी केली होती.
पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती व श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी मूकपदयात्रा, शासकीय महापूजा व पोलिस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी, साखळ दंडाचे पूजन आदी कार्यक्रम झाले. धर्मवीर छत्रपती शंभूराजेंच्या पालखीचे आगमन व स्वागत, तसेच शाहिरी कार्यक्रम पोवाडे, दांड पट्टा व शिवव्याख्यान, रक्तदान शिबिर असे कार्यक्रम झाले.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री आदिती तटकरे, खासदार उदयनराजे भोसले व नीलेश लंके, आमदार माउली कटके, महेश लांडगे व बापूसाहेब पठारे, माजी आमदार अशोक पवार, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, अक्षय महाराज भोसले, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, दत्ताआबा गायकवाड, संदीप भोंडवे, रवींद्र कंद, रामभाऊ दाभाडे, शांताराम कटके, रोहिदास महाराज हांडे आदींसह अनेक मान्यवर तसेच शासकीय अधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून नतमस्तक होत राजांना अभिवादन केले.
भगवे झेंडे हातात घेतलेले कार्यकर्ते ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘हरहर महादेव...’ ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा गगनभेदी घोषणा देत होते. सकाळी गावात काढलेल्या शंभूराजांच्या मूक पदयात्रेत मोठ्या संख्येने परिसरातील शंभुभक्त तरुणाई सहभागी झाली होती.
दिवसभर शाहिरी कार्यक्रम, व्याख्यानाला विविध ठिकाणाहून ज्योती घेऊन आलेल्या तरुणाईनेही गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी, तसेच रक्तदान शिबिरालाही मोठा प्रतिसाद लाभला. तर छावा चित्रपटामुळे, तसेच गावागावात धर्मवीर बलिदान मास कार्यक्रमांमुळेही यावर्षी पुण्यतिथी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आलेल्या शंभुभक्तांनी अभिवादन केले.
शंभू भक्तांना आवश्यक सोईसुविधांसाठी प्रांताधिकारी यशवंत माने, अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते व गटविकास अधिकारी भूषण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळापूर ग्रामपंचायतीने व्यवस्था केली, तर शंभूभक्तांना वाहनतळ, तसेच सुलभ दर्शनासाठीचे नियोजन लोणीकंदचे पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी केले. तुळापूर ग्रामपंचायत पदाधिकारी, शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट व शिवपुत्र विकास प्रतिष्ठानच्या वतीने पाणी व अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.
रक्तदानाला मोठा प्रतिसाद
वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे दरवर्षीच्या मृत्युंजय अमावस्येला ७०० ते ८०० पिश्वी रक्त संकलन होत असे. यावर्षी मात्र सकाळपासूनच सुमारे १०० खुर्च्यांवर रांगा लावून रक्तदाता नोंदणीला आणि प्रत्यक्ष रक्त देण्याचे काम सुरू होते. दुपारी पाचच्या सुमारास येथे जवळपास ५ हजार पिशवी रक्त संकलन झाल्याची माहिती धर्मवीर संभाजीराजे युवा समितीचे वतीने सांगण्यात आले.
३०० शंभूभक्तांची नांदेडहून दिंडी
वढू बुद्रुक येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहताच तब्बल ३०० शंभूभक्तांची पायी वारीची पालखी यावेळी कार्यक्रमाचे दरम्यान दाखल झाली. अशाच पद्धतीने शंभूपालखीची प्रथा संपूर्ण राज्यभर सुरू झाल्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम महायुती सरकार करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.