

मुसळधार पावसाने वैभववाडीला झोडपले; कापणी केलेल्या भातपिकांचे नुकसान
ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम असून, सोमवारी (ता. २) सायंकाळी वैभववाडी तालुक्याला विजांच्या कडकडाटांसह झालेल्या मुसळधार पावसाने झोडपले. सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यांच्या काही भागांतही पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान, पावसामुळे कापणी केलेल्या भातपिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात रविवारी सावंतवाडी, वैभववाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांच्या बहुतांश भागांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू होत्या. त्यानंतर सोमवारी पहाटे सावंतवाडी तालुक्यातील अनेक भागांत पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली. दुपारपर्यंत कडक ऊन होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर वैभववाडी तालुक्यातील करूळ, भुईबावडा परिसरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरात संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. तासभर झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपून काढले. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीतही काहीशी वाढ झाली आहे. वैभववाडी शहरात सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती झाली होती. अनेक दिवसांनंतर शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी भातपिकाची कापणी केली होती. मात्र, कापणी केलेले हे पीक पावसात भिजले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा ३६ टक्के पावसाची तूट होती. सप्टेंबरमध्ये अनेक नदीनाल्यांची पात्रे कोरडी पडू लागली होती. जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी १०,४३९ वनराई बंधारे बांधले आहेत. मात्र, जिल्ह्यात ईशान्य मॉन्सूनचा पाऊस चांगला होत आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्याच्या काही भागांत झालेल्या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. हा पाऊस संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
फोटो ओळ :
मुसळधार पावसामुळे कोकिसरे नारकरवाडी (ता. वैभववाडी) येथे कापणी केलेले भातपीक पावसात भिजत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.