वडारवाडी झोपडपट्टीच्या वास्तवाला मूल्य शिक्षणाचा आधार!

pune.jpg
pune.jpg

पुणे : तापल्या विस्तवाप्रमाणे वास्तव आपल्या आजूबाजूला फिरतंय.  'आयुष्य सुंदर असतं!' या केवळ तथाकथित कलासहित्यातील वाक्यांचा पोकळपणा जिथे उघड पडतो अशा घरामध्ये जन्माला येणे हे मोठे दुःख असते. परंतु अशा स्थितीत राहावं लागणारी वडारवाडी झोपडपट्टीतील कोवळ्या वयातील मुले आहेत. एक सभ्य आणि सुस्थितीत राहणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त काय समस्या असतील? घरपट्टी, पाणीपट्टी, मानसिक आणि शारीरिक ताण. बस्स! परंतु वडारवाडी म्हटले कि, नाके तोंडे मुरडले जातात. मध्यमर्गीयांपासून श्रीमंत लोक इथे येणंही टाळतात. पण काय असते इथली परिस्थिती आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी काय आहे 'वडारवाडी?

वडारवाडीत राहणाऱ्या मुलांसाठी ती झोपडपट्टी नाही, त्यांचे घर आहे. जिथे  दारू भट्टी, ड्रग्स, सिगारेट, गांजा अशा नशील्या पदार्थांचा वावर रोजच आपल्या झोपडीत आणि उंबरा ओलांडताच झोपडीच्या बाहेरही असतो. त्यात आई धुणीभांडी-घरकामे करून आणि वडील दारूभट्टी, ओझे वाहण्याची कामे किंवा नाले-गटारांची सफाई करून थकून घरी येतात. तेव्हा त्यांच्यात संवाद न होता वादच होत असतात. दोघेही दिवसभराच्या कष्टामुळे दमून थकवा दूर करण्यासाठी दारूचा आधार घेतात. आई वडीलच नशेच्या स्वाधीन आहे हे बघून मुलेही कोवळ्या वयात अमली पदार्थांचे सेवन करू लागतात. पाल  त्यांच्या कष्टाच्या वयात दारूचे अतीसेवनामुळे म्हातारपणी घरात नेहमीच कोणी ना कोणीतरी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रासलेले असते. त्यामुळे हे सगळं अनुभवून या नवजीवांचे मन लहानपणीच मरून जाते.  

त्यातल्या त्यात झोपड्पट्टीतही गरीब, कमी गरीब आणि सगळ्यात जास्त गरीब अशी मुले राहतात. त्यामुळे आर्थिक परिस्थितीत कधीकधी घाणीतले उचलूनही ते त्या वेळची भूक भागवतात. तेव्हा आपण किळसवाण्या चेहऱ्यांनी म्हणतो, यांना पोषक अन्नाचे महत्व समजायला हवे. पण या झोपडपट्टी वासियांना तसे अन्न खावे जरी वाटले तरी ते मिळणार कसे? कधीकधी तर 'शिक्षणाने ही लोकं यांची परिस्थिती सुधारू शकतील' असे ढळढळीत वक्तव्य मोठीमोठी लोकं करतात. पण या वस्तीतल्या मुलांना जेव्हा काही शिकवले जाते तेव्हा ते विचारतात हे शिकून आम्हाला किती पैशाची नोकरी लागणार. ? त्यामुळे इथे विचारांची श्रीमंती वाढवणे गरजेचे होते. कारण या सगळ्या रखरखीत वास्तवाचा परिणाम मोठ्यांपेक्षाही नुकत्याच जग बघायला आलेल्या कोवळ्या जीवावर खूप जास्त होतो. याचा विचार कुणीही करत नाही.  

झोपडपट्टीत हा शिक्षणाचा आणि विचारांचा अभाव आरती घुले यांनी बघितला आणि शाळेला लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमधील वेळ त्यांनी  स्वतःसाठी घालवण्यापेक्षा समाजासाठी द्यायचे ठरवले. या विचारांतून त्यांनी ३६ मुलांची 'नैतिक मूल्य शिक्षणा'ची शाळा स्वतःच्या फ्लॅटमध्ये सुरु केली. व्हिजन नर्सरी स्कुल येथे पेशाने शिक्षिका असलेल्या आरती यांची शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला शिकवण्याची आवड होती. ती कल्पना या मुलांचे वास्तव बघून दाटून आली. फ्लॅटमधल्या शाळेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, "पहिल्याच प्रयत्नात ३६ मुलांना शिकवणे आणि सोसायटीत हि शाळा भरवणे हे आव्हानात्मक होते. परंतु हळुहळू सगळंच जमून येऊ लागले. 

मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून या मुलांना 'पोषक विचारांचे शिक्षण देणे' हा या माझा मुख्य उद्देश होता. मूल्य शिक्षणाच्या या शाळेत उठण्या- बसण्याची पद्धत, शिस्त, शिष्टाचार,  इंग्रजीचे धडे,  व्यक्तिमत्व विकास,  मेंदूचा विकास (ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी) शिकवले जाऊ लागले. हे या मुलांना हळूहळू  आवडू लागले. गाणी, गप्पा, गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण द्यायचे, असा शाळेचा अभ्यासक्रम ठरवला. शिकण्याची इच्छा असल्यामूळे आरती घुले यांच्या बुद्धिमत्तेचा ते जास्तीत जास्त फायदा करून घेऊ लागले.   
या आगळ्यावेगळ्या शाळेचा विचार मनात कसा आला असे विचारताच त्या म्हणाल्या, घराच्या बाहेरच असलेल्या वडारवाडी झोपडपट्टीतील मुलांमध्ये फावल्या वेळात त्या वेळ घालवू लागल्या. या मुलांची परिस्थिती पाहून आणि त्यांच्याकडून ऐकल्यानंतर विचारांनी त्रस्त होऊन मी ठरवले, "ह्या मुलांना गोळा करून संध्याकाळच्या वेळेत नैतिक मूल्याचे शिक्षण दिले तर ? " यासाठी एका मुलाला वस्तीतील इतर मुलांना गोळा करावयास सांगितले. तेव्हा पाच दिवसात तब्बल ३६ मुले यासाठी तयार झाले. हि नैतिक मूल्य शिक्षणाची शाळा ६ ते ८ या वेळेत विनामूल्य भरू लागली. या मुलांकडून एक शिकण्यासारखे होते, याप्रमाणे आजची तरुणाई छोटयाछोट्या गोष्टींवरून तक्रार करते, त्यांनी या मुलांचे आयुष्य एकदा बघावं, ती परिस्थिती अंगावर काटा आणणारी असते. अशा परिस्थितीत झोपडपट्टीमधील मुलांवर कमी वयातच मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर पडू लागतात. त्यामुळे  जबाबदारी आणि अनुभव यामुळे या ८-१२ वर्षाच्या मुलांमध्ये या वयातच स्वावलंबन येते. ही शिकवण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करणाऱ्या  तरुणाईसाठी मोलाची ठरते. 

"आई-वडील दिवसभर कष्टाची कामे करून थकल्यामुळे दारूच्या नशेत झोपतात. त्यामुळे हि कोवळ्या वयातील मुले दारूचे अड्डे, सिगारेट आणि नशेच्या पदार्थांच्या सानिध्यात राहिल्यामुळे मुलांची विचारशक्ती कमकुवत होते. त्यांना प्रेमाची कमतरता आहे. त्यांची परिस्थिती बघून वाईट वाटण्यापेक्षा त्यांच्यासाठी पैशाने नाहीतर आपला वेळ देऊन मदत करणे आवश्यक आहे.  अशा मुलांसाठी समाजाने पैशापेक्षा वेळ आणि आधार देऊन मदत करणे गरजेचे आहे. प्रा. घुले म्हणाल्या  या मुलांच्या घरची वास्तविकता पाहून मी करत असलेल्या कामाचा मला अभिमान वाटतो. या मुलांना वाटते, त्यांना मी शिकवत आहे. पण या ३६ गुरूंनी मला आयुष्याचे ३६ धडे दिले आहे. 

अशा या कुपोषित विचारांच्या वातावरणात, दारूने धुंद असलेल्या व्यसनाधीन घरात वावरणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे शिक्षणाची तशी नैतिक मूल्य शिक्षणातून विचारांची श्रीमंती मिळणे आवश्यक आहे, याचे महत्त्व प्रा. आरती घुले यांनी जाणले आणि ते त्या कृतीतून उतरवत आहे. वास्तव जळजळीत असतेच पण तो विस्तव थंड करून झेलण्याची ताकद प्रा. घुले यांनी दाखविली. झोपडपट्टीतील या मुलांना यातून बाहेर काढायचे तर विचारांचे शिक्षण किती गरजेचे आहे यासाठी प्रा. आरती घुले काम करत आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com