
चतुरस्र अभिनेत्री ही वंदना गुप्ते यांची ओळख. ‘संगीत पद्मशील धुंडिराज’ ते ‘हरविलेल्या पत्त्यांचा बंगला’, अशा पन्नासहून अधिक नाटकांतील भूमिका त्यांनी गाजविल्या. रंगभूमीवरील त्यांच्या कारकिर्दीला पाच दशकं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी ‘सकाळ’शी साधलेल्या संवादात त्यांचा नाट्यप्रवास मनमोकळेपणानं उलगडला...
'संस्कारामुळेच यश टिकवणं जमलं'
चतुरस्र अभिनेत्री ही वंदना गुप्ते यांची ओळख. ‘संगीत पद्मशील धुंडिराज’ ते ‘हरविलेल्या पत्त्यांचा बंगला’, अशा पन्नासहून अधिक नाटकांतील भूमिका त्यांनी गाजविल्या. रंगभूमीवरील त्यांच्या कारकिर्दीला पाच दशकं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी ‘सकाळ’शी साधलेल्या संवादात त्यांचा नाट्यप्रवास मनमोकळेपणानं उलगडला...
ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा
विद्यार्थिदशा कायम ठेवा
यश टिकवून ठेवणं, ही अवघड गोष्ट आहे, ते मला जमलं. त्याला आई-वडिलांचा संस्कार कारणीभूत आहे. त्यांनी सांगितल होतं, की कोणत्याही क्षेत्रात जाल, तिथं नाव होईल असं काम करा आणि समाजाला विघातक वाटेल असं काही करू नका. विद्यार्थिदशा कायम ठेवा. आपल्यावर आणखी एक पायरी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. हाच मंत्र आम्हाला सर्वकाही देत गेला...
माणिकबाईंच्या (वर्मा) मुली म्हणून आम्ही गायनात रमत होतो. त्यातही मला उडत्या चालीची गाणी गायला आवडायचं. त्यातला खटका अभिनेत्री मनोरमा वागळे यांनी पाहिला आणि त्यांना तो आवडला. त्या वेळी ‘संगीत पद्मशील धुंडिराज’ हे नाटक रंगमंचावर येणार होतं. त्यात एका खट्याळ मुलीची भूमिका होती. मला त्यासाठी विचारण्यात आलं. आलेली संधी नाकारणं माझ्या स्वभावात नाही, म्हणून मी होकार दिला. पण, लगेच कुठं अभिनय? त्यासाठी तीन महिने अभिनयाची कार्यशाळा पूर्ण करावी लागली. १९७० मध्ये माझं पहिलं पाऊल रंगमंचावर पडलं. हा अनुभव मला शाळेसारखाच होता. माझ्यात मिस्कीलपणा होताच. पण, त्यात मला विनोदाचं टायमिंग गवसलं. या नाटकाला खूप लोकप्रियता मिळाली. पुढं स्पर्धेतील नाटकांमध्ये भाग घेत राहिले...
माझं लग्न १९७३ मध्ये झालं. त्यानंतर मी नाटकात काम करणं सोडलं. पण, ‘अखरेचा सवाल’ या नाटकासाठी भक्तीला (बर्वे) ‘रिप्लेस’ म्हणून दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरू होता. विनोदाची जाण असलेली अभिनेत्री त्यांना हवी होती. तेव्हा मला विचारण्यात आलं. पण, मी नकार दिला. पण, मीच काम करावं म्हणून ‘गोवा हिंदू असोसिएशन’चे काही लोक माझ्या घरी आले. त्या वेळी माझ्या सासऱ्यांनी मला प्रोत्साहन दिलं. ‘माणिकबाईंची लेक तू, त्यांनी कलेसाठी आयुष्य दिलं. तू नाटकात काम केलं पाहिजे,’ असं त्यांनी सांगितलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक होतं. माझ्या आयुष्यातील हे पहिलं व्यावसायिक नाटक. त्यात दत्ता भट, मधुकर तोरडमलांसारखे मोठे कलाकार होते. त्यांच्या कलेच्या निरीक्षणातून मला खूप शिकायला मिळालं. अभिनयातील संवादाची देव-घेव, देहबोली समजत गेली.
मोहन वाघ यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. ‘गाठ माझ्याशी आहे’ या नाटकात वकिलाची भूमिका केली. तोरडमलांचं ‘झुंज’ नाटक फार काही देऊन गेलं. मी नेहमी शहरी वळणाच्या भूमिका केल्या. पण, या नाटकातील भूमिका ग्रामीण बाजाची आणि वेगळी होती. भूमिकेचा अभ्यास करावा लागतो, हेही याच नाटकानं शिकवलं. या भूमिकेसाठी मी दलित वस्तीमध्ये जाऊन राहिले. तेथील महिलांचा स्वभाव, राहणीमान यांचं निरीक्षण केलं. मला वेगळं काहीतरी करण्याची नेहमी आस राहिली आहे. या वृत्तीनं मला नाटक शिकवलं. वसंत कानेटकरांचं ‘सोनचाफा’ हे नाटक करिअरमधील ‘टर्निंग पॉइंट’ ठरलं.
नाट्य रंगभूमीवर मध्यंतरीचा काळ जरासा रिता गेला. गल्लाभरू नाटकं आली. चांगली नाटकं मिळेना म्हणून मालिकांकडं वळले. पण, तिथंही मन रमेना म्हणून पुन्हा रंगभूमीवर आले. माझा आत्मा नाटकात गुंतलेला आहे.
मला वाटतं नव्या पिढीकडं खूप काही आहे. नाटकांच्या माध्यमातून चांगले विषय घेऊन ते रंगभूमीवर येत आहेत. ही आश्वासक स्थिती आहे. त्याला प्रेक्षकांनी पाठबळ दिलं पाहिजे. सध्या गावोगाव लोक टीव्हीच्या आहारी गेले आहेत. त्यातून बाहेर पडून नाटकांकडंही त्यांनी वळलं पाहिजे. मराठी भाषेत जे जे आहे, त्याची गोडी मराठी माणसानं त्यांच्या मुलांना लावली पाहिजे. मराठी भाषा टिकवण्यासाठीदेखील हे महत्त्वाचं आहे.
(शब्दांकन : संतोष शाळिग्राम)